Amit Shah In Amravati : उद्या (24 एप्रिल) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची अमरावतीमध्ये (Amravati) जाहीर सभा होणार आहे. तर या सभेसाठी मोठा मंडप बांधण्यात आला आहे. पण आज अचानक हा मंडप कोसळल्याची घटना घडली आहे. तर दुसरीकडे या सभास्थळाच्या परवानगीवरून बच्चू कडू (Bachchu Kadu) आक्रमक झाले आहेत.
अमरावती येथील सायन्सकोर मैदानावर अमित शाह यांच्या सभास्थळावरील मंडपाचा काही भाग अचानक कोसळला आहे. वादळी वाऱ्यामुळे मंडपाचा काही भाग कोसळला आहे. तर दुसरीकडे या मैदानाबाहेर बच्चू कडू आणि त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून ते ठिय्या मांडून आहेत. त्यामुळे सायन्सकोर मैदानाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे.
सायन्सकोर मैदानावर सभेसाठी बच्चू कडू यांनी परवानगी घेतली होती. मात्र, ऐनवेळी बच्चू कडू यांना मैदानावर जाण्यापासून अडवण्यात आलं. त्यामुळे बच्चू कडू हे आक्रमक झाले असून ते ठिय्या आंदोलनावर ठाम आहेत.
यावेळी मंडप कोसळल्याच्या घटनेवर बच्चू कडू म्हणाले की, हनुमानजींनी काम दाखवले आहे. एक लाथ मारली आणि मंडप पाडला. तर पुढे मैदानात जाण्यापासून अडवण्यात आल्याबाबत ते म्हणाले की, ही जबरदस्ती सुरू आहे, देव आमच्यासोबत आहेत. इथे कायदा राहिलेलना नाहीये. पोलीस अधिकारी देखील भाजपसारखे बोलत आहेत. आम्हाला भाजपचं ऐकावे लागले असं पोलीस सांगत आहेत, असं बच्चू कडू म्हणाले.