लोकसभेचे बिगुल वाजले आहे.सर्व पक्षांनी प्रचार जोरदारपणे सुरु ठेवला आहे. भाजपचे स्टार प्रचारक प्रत्येक लोकसभा मतदार संघात जाऊन प्रचारसभा घेत आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष सध्या मध्य प्रदेश दौऱ्यावर आहेत. दरम्यान यावेळी जेपी नड्डा यांनी काँग्रेससह इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली आहे. भाजपचे उमेदवार वीरेंद्र कुमार यांच्या समर्थनार्थ मध्य प्रदेशातील मुक्कामादरम्यान भाजप अध्यक्ष नड्डा मंगळवारी टिकमगढ येथे जाहीर सभेला संबोधित केले.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की, ”एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचाराचा नायनाट करत आहेत, तर दुसरीकडे इंडिया आघाडी भ्रष्टाचाऱ्यांना वाचवण्यात मग्न आहे. काँग्रेसच्या काळात कोळसा, पाणबुडी, हेलिकॉप्टर, साखर, तांदूळ, कॉमनवेल्थ, टूजी घोटाळे झाले. त्याने तिन्ही जगात घोटाळा केला. राहुल गांधी, सोनिया गांधी, लालू यादव जामिनावर आहेत. अरविंद केजरीवाल आणि टीएमसीचे मंत्री तुरुंगात आहेत. त्यातील निम्मे जामिनावर तर निम्मे तुरुंगात आहेत. दरोडा टाकून गरिबांचे हक्क हिरावून घेतात.”
यापुढे सभेला संबोधित करताना जेपी नड्डा म्हणाले, ”विकसित भारतासाठी आपल्याला स्थिर, मजबूत आणि निर्णायक सरकार हवे आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द करणे हे स्थिर सरकारचे परिणाम आहे. 1997 मध्ये आम्ही पालमपूरमध्ये राम मंदिर बांधण्याबाबत बोललो होतो. त्यावेळी आमचे विरोधकही यासाठी आमची खिल्ली उडवत असत. मात्र आता राम मंदिराचे निर्माण झाले आहे.”