Marcus Stoinis : काल (23 एप्रिल) चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात चुरशीचा सामना पार पडला. तर या सामन्यादरम्यान लखनौ सुपरजायंट्सचा स्फोटक फलंदाज मार्कस स्टॉइनिसची (Marcus Stoinis) बॅट चेन्नईविरुद्ध जोरदार गर्जना करत होती. स्टॉइनिसने मंगळवारी चेन्नईत स्फोटक खेळी खेळली. स्टॉइनिसने आयपीएलमधील पहिले शतक झळकावले आहे. त्याने अवघ्या 56 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. स्टॉइनिसच्या या दमदार खेळीमुळे लखनौने चेन्नईचा सहा गडी राखून पराभव केला.
मार्कस स्टॉइनिसने 63 चेंडूत 124 धावांची स्फोटक खेळी खेळली. मार्कस स्टॉइनिसने आपल्या खेळीत 13 चौकार आणि सहा षटकार मारले. स्टॉइनिसने या शतकासह चेन्नईच्या तोंडून विजय हिसकावून घेतला. लखनौ संघाने 210 धावांचे लक्ष्य 19.3 षटकात पूर्ण केले.
मार्कस स्टॉइनिसचे टी-20 क्रिकेटमधील हे दुसरे शतक आहे. या खेळीसह मार्कस स्टॉइनिसच्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला गेला. धावांचा पाठलाग करताना त्याने आयपीएलमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या केली. त्याने 2011 मध्ये चेन्नईविरुद्ध 120 धावा करणाऱ्या पंजाब किंग्जचा फलंदाज पॉल व्हॅल्थाटीला मागे टाकले होते.
मार्कस स्टॉइनिस हा चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. याआधी 122 धावा करण्याचा विक्रम वीरेंद्र सेहवागच्या नावावर होता. तर स्टॉइनिसने लखनौ सुपर जायंट्ससाठी दुसरी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या केली.