पंतप्रधान मोदी हे सातत्याने काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका करत आहेत. मंगळसूत्र या विषयावरून त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंगळसूत्रावरील टिप्पणीला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९६२ च्या भारत-चीन युद्धात त्यांचे दागिने दान केले होते,असे प्रत्युत्तर खरगे यांनी दिले आहे. यावेळी त्यांनी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काही त्याग केला होता का असा सवाल देखील उपस्थित केला आहे.
याबाबतीत खरगे यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. यात ते म्हणाले, ”भाजप-आरएसएसच्या कोणत्याही नेत्याने देशासाठी काय बलिदान दिले आहे? राष्ट्रीय चळवळीतही त्यांनी भाग घेतला नाही. निवडणुकीच्या निमित्तानं आपले मंगळसूत्र सुरक्षित राहणार नाही, असे मोदी जनतेशी खोटे बोलत आहेत. काँग्रेसने ५५ वर्षे देशावर राज्य केले. असं एकदाही झालंय का? इंदिरा गांधींनी १९६२ च्या युद्धात आपले दागिने दान केले होते. पंडित मोतीलाल नेहरू आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अलाहाबादमधील आनंद भवन म्हणून आपले असलेले घर स्वातंत्र्य चळवळीला दान केले. आपल्या नेत्यांनी देशासाठी आपले प्राण आणि रक्त अर्पण केले आहे.” तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींनी गेल्या आठवड्यात आरोप केला होता की काँग्रेसला लोकांचे सोने आणि मालमत्ता हिसकावून घ्यायची आहे आणि “जास्त मुले असलेल्यांमध्ये” वाटप करायचे आहे.