Mahadeo Jankar : येत्या 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्याचा समावेश असून येथे त्यादिवशी मतदान होणार आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर नेत्यांकडून प्रचार सभा घेतल्या जात आहेत. या प्रचार सभांमध्ये नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. यामध्ये आज अमरावतीमध्ये गृहमंत्री अमित शाह आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सभा होत आहे.
दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर काल (23 एप्रिल) उद्धव ठाकरे यांची परभणीमध्ये सभा पार पडली. या सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी परभणीकरांना समोरच्या महायुतीच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त करण्याचं आवाहन केलं. तर आता उद्धव ठाकरेंच्या या विधानावर महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी जानकरांनी ठाकरेंना इशार देखील दिला.
उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देताना महादेव जानकर म्हणाले की, एका शेतकऱ्याचं पोरगं मुख्यमंत्री झालेलं आणि माझ्यासारखा पोरगा खासदार झालेला उद्धव ठाकरेंना बघवत नाही का? असा सवाल जानकरांनी केला. तसेच 26 एप्रिलनंतर मी राज्यभरात ठाकरेंच्या विरोधात रान पेटवणार आले, असा इशाराही त्यांनी दिला.
मला परभणी लोकसभा मतदारसंघातील लोकांनी आपलंसं केलं आहे. मी जवळपास 90 टक्के मतदारसंघ फिरलो आहे, त्यामुळे लोक माझ्या पाठिशी उभे आहेत. तसेच लोकसभा निवडणुकीत माझी साडेचार लाखांची लीड राहील आणि जर मी परभणीतून निवडून आलो नाही तर सन्यास घेईल, अशी घोषणाही महादेव जानकरांनी केली.
दरम्यान, परभणीमध्ये रासपचे महादेव जानकर यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून संजय बंडू जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे परभणीत कुणाचा गुलाल उधळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.