Vilasrao Jagtap : सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. तर काही ठिकाणी प्रचारादरम्यान तणाव निर्माण होण्याच्या घटना घडताना दिसत आहेत. यामध्ये आज (25 एप्रिल) सांगलीत प्रचारादरम्यान एका माजी आमदाराच्या गाडीवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर सांगलीत एकच खळबळ उडाली आहे.
आज सांगली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांचा प्रचार सुरू होता. या प्रचारात माजी आमदार विलासराव जगताप हे देखील सहभागी झाले होते. तर या प्रचारादरम्यान जिरग्याळ-मीरवाड रस्त्यावर विलासराव जगताप यांच्या गाडीवर दोन ते तीन जणांकडून दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे.
या घटनेनंतर विलासराव जगताप यांनी जत पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसंत विशाल पाटलांच्या प्रचारामध्ये सहभागी होऊ नये यासाठी हल्ला करून दबाव आणण्याचा प्रयत्न विरोधक करत असल्याचा आरोप विलासराव जगताप यांनी केला आहे. तसेच भाजप खासदार संजयकाका पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोपही विलासराव जगताप यांनी केला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाजप खासदार संजयकाका पाटील यांच्या उमेदवारीला विरोध करत विलासराव जगताप यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.