देशभरात लोकसभा निवडणुकीचा प्रचार दिवसेंदिवस तीव्र होताना दिसून येत आहे. सर्व पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. इंडिया आघाडीने एनडीएला यंदाच्या निवडणुकीत पराभूत करण्याचा चंग बांधला आहे. तर एनडीएने केंद्रात तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्यासाठी प्रचाराला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात प्रचार सभांचा धडाका लावला आहे. तर नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रात महायुतीने ४५ प्लस मिशन डोळ्यांसमोर ठेवले आहे. आज आपण हिंगोली लोकसभा मतदारसंघाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तिथे महायुती आणि महाविकास आघाडीने, वंचित बहुजन आघाडीने कोणाला उमेदवारी दिली आहे. राजकीय ताकद कशी आहे. तेथील प्रश्न कोणते आहेत, हे जाणून घेणार आहोत.
हिंगोली लोकसभेत महायुतीने शिवसेनकडून बाबुराव कदम कोहळीकर यांना तिकीट दिले आहे. तर महाविकास आघाडीने ठाकरे गटाकडून नागेश पाटील अष्टेकर यांना तिकीट दिले आहे. दरम्यान विद्यमान खासदार हेमंत पाटील यांचे तिकीट कापून बाबुराव कदम कोहळीकर यांना तिकीट दिले आहे. हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली. मात्र अचानक उमेदवार बदलण्यात आला. हिंगोलीत असली व नकली शिवसेना कोणती याचा फैसला होणार असल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, मागील काही वर्षांत हिंगोलीत निवडून आलेला उमेदवार पुन्हा न निवडून देण्याची परंपरा या ठिकाणी राहिली आहे. या ठिकाणी भाजपच्या दबावामुळे हेमंत पाटलांची उमेदवारी बदलण्यात आल्याची चर्चा आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघ तीन जिल्ह्यात विभागला आहे. हिंगोली, नांदेड, यवतमालमधील उमरखेड चा समावेश यामध्ये होतो. यात ६ विधानसभा मतदारसंघ येतात. या लोकसभा मतदारसंघात धनगर, मराठा आणि मुस्लिम समाजाचे मतदान निर्णायक ठरते. या निवडणुकीत मराठा समाजाचा रोष कदाचित दिसण्याची शक्यता आहे. आरक्षणाच्या विषयावर मराठा समाजाच्या विरोधात सरकारविरुद्ध नाराजी असल्याचे दिसून येत आहे.
वंचित बहुजन आघाडीने यंदा बंजारा समाजातील बीडी चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यंदा हिंगोली लोकसभेसाठी ३३ उमेदवार रिंगणात आहेत. मागच्या वेळी वंचितच्या उमेदवाराने दीड लाखांपेक्षा जास्त मते घेतल्याने काँग्रेसच्या सुभाष वानखेडे यांना पराभूत व्हावे लागले होते. भाजपाकडून हा मतदारसंघ आपल्या ताब्यात येण्यासाठी गेल्या वर्षीपासून प्रयत्न सुरु होते. मात्र ही जागा शिवसेनेला सुटल्यानंतर देखील दबावतंत्र वापरून शिवसेनेला उमेदवार बदलायला भाग पडल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार महाविकास आघाडीची धोकादायक ठरणार का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.