Loksabha Election 2nd Phase : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. १३ राज्यातील ८८ जागांवर मतदानाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात देखील ८ जागांवर मतदान होत आहे. दुसऱ्या टप्प्यात केरळमधून २०, कर्नाटकातून १४, राजस्थानमधून १३, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी आठ, मध्य प्रदेशातून ७, आसाम आणि बिहारमधून प्रत्येकी पाच, बंगाल आणि छत्तीसगड, जम्मू-काश्मीर, मणिपूरमधून प्रत्येकी तीन. आणि त्रिपुरामध्ये प्रत्येकी एका जागेवर निवडणूक होत आहे.
दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. लोकशाही रक्षण करण्यासाठी मतदान करा, असे आवाहन राहुल गांधींनी केले आहे.
“माझ्या प्रिय देशबांधवांनो! आज या ऐतिहासिक निवडणुकीचा दुसरा टप्पा आहे जो देशाचे भवितव्य ठरवणार आहे. पुढचे सरकार ‘काही अब्जाधीशांचे’ की ‘१४० कोटी भारतीयांचे’ हे तुमचे मत ठरवेल. त्यामुळे आज घराबाहेर पडून ‘संविधानाचा सैनिक’ बनून लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे”, असं राहुल गांधींनी ट्विट करत म्हटलं आहे.
दरम्यान, दुसऱ्या टप्प्यातील प्रमुख उमेदवारांमध्ये भाजपच्या उमेदवारांमध्ये केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांचा समावेश आहे. तिरुवनंतपुरममधून ते काँग्रेसचे शशी थरूर यांच्याशी निवडणूक लढवत आहेत. रामायण मालिकेतील अभिनेने अरुण गोविल, अभिनेत्री हेमा मालिनी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते तेजस्वी सूर्या आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, काँग्रेस नेते राहुल गांधी, केसी वेणुगोपाल, भूपेश बघेल आणि अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव गेहलोत हेही रिंगणात आहेत. तर महाराष्ट्रात हिंगोली, नांदेड, अकोला, परभणी, अमरावती, यवतमाळ वाशीम, नांदेड, वर्धा या लोकसभा मतदार संघात मतदान होत आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.