Manoj Jarange Patil : आरक्षणासाठी केलेले उपोषण आणि राज्यभर केलेला दौरा यामुळे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे सध्या त्यांच्यावर गॅलेक्सी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, आज लोकशाहीचा मोठा उत्सव आहे या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचले.
मनोज जरांगे पाटील हे परभणीतील शाह गडच्या मतदान केंद्रावर दाखल झाले. परभणीमध्ये महादेव जानकर विरूद्ध संजय जाधव यांच्यात लढत होणार आहे. तर आम्ही कोणाला विजयी करण्यासाठी नाही तर नक्कीच कोणाला तरी पाडू शकतो, असं सूचक वक्तव्य मनोज जरांगेंनी यावेळी केलं आहे.
दरम्यान, आज सकाळी 7.०० पासून राज्यात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. आज महाराष्ट्रात ८ जागांवर मतदान होत आहे. महाराष्ट्रात हिंगोली, नांदेड, अकोला, परभणी, अमरावती, यवतमाळ वाशीम, नांदेड, वर्धा या लोकसभा मतदार संघात मतदान होत आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.