दिल्लीतील दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत 8 मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे. दिल्ली न्यायालयाने मनीष सिसोदिया तसेच विजय नायर आणि इतर आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 8 मे 2024 पर्यंत वाढ केली आहे. त्यांची न्यायालयीन कोठडी संपल्याने त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते.
दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी तत्कालिन उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते तिहारमध्ये बंदिस्त आहेत. मनीष सिसोदिया यांच्यावर दिल्ली उत्पादन शुल्क धोरणात सुधारणा करताना, परवाना धारकांना अवाजवी लाभ देणे, परवाना शुल्क माफ करणे किंवा कमी करणे आणि सक्षम अधिकाऱ्याच्या मंजुरीशिवाय परवाने देणे अशा अनियमितता केल्याचा आरोप आहे. सीबीआयने मद्य घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात मनीष सिसोदिया यांनाही अटक केली असून या प्रकरणी त्यांची न्यायालयीन कोठडी 8 मे पर्यंत वाढवण्यात आली आहे.
यावेळी कोर्टाने सीबीआयला जबाब आणि पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले होते.तत्पूर्वी, दिल्ली न्यायालयाने शनिवारी मद्य घोटाळा प्रकरणात ईडी आणि सीबीआयने नोंदवलेल्या भ्रष्टाचार आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर आपला आदेश राखून ठेवला होता. सीबीआय आणि ईडीच्या विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी केंद्रीय तपास यंत्रणा आणि सिसोदिया यांच्या वकिलाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर 30 एप्रिलला आपला आदेश राखून ठेवला होता.