देशभरात लोकसभा निवडणुकीचा प्रचार दिवसेंदिवस तीव्र होताना दिसून येत आहे. सर्व पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. इंडिया आघाडीने एनडीएला यंदाच्या निवडणुकीत पराभूत करण्याचा चंग बांधला आहे. तर एनडीएने केंद्रात तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्यासाठी प्रचाराला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात प्रचार सभांचा धडाका लावला आहे. तर नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रात महायुतीने ४५ प्लस मिशन डोळ्यांसमोर ठेवले आहे. आज आपण यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तिथे महायुती आणि महाविकास आघाडीने, वंचित बहुजन आघाडीने कोणाला उमेदवारी दिली आहे. राजकीय ताकद कशी आहे. तेथील प्रश्न कोणते आहेत, हे जाणून घेणार आहोत.
महायुतीने यवतमाळ वाशिममध्ये विद्यमान खासदार भावना गवळी यांचे तिकीट कापून मराठवाड्यातुन राजश्री पाटील यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे गेल्या १५ वर्षांपासून असलेले वर्चस्व टिकवण्याचे आव्हान शिवसेनेपुढे असणार आहे. या ठिकाणी भावना गवळी सलग ५ टर्म खासदार होत्या. मात्र यावेळेस त्यांचे तिकीट कापून राजश्री पाटील यांना देण्यात आले आहेत. राजश्री पाटील या हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी आहेत. हा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला. मात्र भावना गवळी यांच्यावर झालेले भ्रष्टाचाराचे व अँटी इन्काबंसी यामुळे भाजपाने त्यांना उमेदवारी देण्यास विरोध केला होता. महाविकास आघाडीच्या ठाकरे गटाने संजय देशमुख यांना यवतमाळ वाशिमचे लोकसभेचे तिकीट दिले आहे.
यवतमाळ वाशिममध्ये यंदा असली व नकली शिवसेना कोणती आहे ते कळणार आहे असे तेथील जनतेचे किंवा शिवसेना, ठाकरे गटाचे म्हणणे आहे. यामध्ये मुख्य लढत राजश्री पाटील विरुद्ध संजय देशमुख यांच्यातच होणार आहे. आधी हा मतदारसंघ खामगाव लोकसभा नावाने ओळखला जायचा. त्यानंतर २००८ मध्ये पुनर्रचनेत यवतमाळ वाशीम असे नामकरण झाले. सुरुवातीच्या काळात हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. त्यानंतर १९९९ पासून हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात राहिला आहे. भावना गवळी येथून पाच वेळा निवडून आल्या आहेत. या लोकसभा मतदारसंघात यवतमाळमधील चार तर वाशीममधील २ विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. यापैकी चार भाजपाकडे तर, एक शिवसेनेकडे तर एक राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीचा एकही आमदार नाहीये. त्यामुळे या लोकसभा मतदारसंघात महायुतीचे पारडे अत्यंत मजबूत दिसत आहे.भावना गवळी यांना मानणार वर्ग मोठा आहे. यंदा त्या तिकीट मिळालं नसल्याने नाराज आहेत. त्यानंतर राजश्री पाटील यांच्या प्रचारात त्या किती सक्रिय होतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
राजश्री पाटील या खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी आहेत. यवतमाळ हे त्यांचे महेर आहे. गोदावरी अरबन बँकेच्या त्या अध्यक्ष आहेत. गेल्या काही वर्षांत त्यांनी महिलांसाठी विविध प्रकारे चांगले कार्य केले आहे. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. २०१२ मध्ये नांदेड दक्षिणमधून त्यांना उमेदवारी मिळावी होती. तेव्हा त्यानं ३७ हजार मते मिळाली. आता थेट त्या लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत.
माविआने संजय देशमुखांना उमेदवारी दिली आहे. यंदा ठाकरे गटाकडे हा मतदारसंघ देशमुख खेचून आणणार हे पाहणे आवश्यक आहे. त्यांनी अनेक वर्षे अपक्ष म्हणून राजकारण केले. ते अनेक वर्षे अपक्ष आमदार राहिले आहेत. अपक्ष असून देखील ते राज्यमंत्री राहिले आहेत. २००२ ते २००४ ते राज्यमंत्री होते. २००८ पासून संजय देशमुख हे यवतमाळ बँकेचे संचालक आहेत. २०१९ मध्ये दिग्रस येथे सेनेच्या संजय राठोड यांनी संजय देशमुख यांचा पराभव केला होता.