आज (26 एप्रिल) नांदेड लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. मात्र, मतदान सुरू असताना एक धक्कादायक प्रकार घडला आहे. नांदेड मतदारसंघातील ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर एका तरूणानं ईव्हीएम मशिनची कुऱ्हाडीनं तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील रामतीर्थ गावात घडला आहे. या गावातील भय्यासाहेब येडके नावाचा एक तरूण मतदान केंद्रावर मतदानासाठी आला होता. यावेळी त्याने त्याच्यासोबत एक कुऱ्हाड लपवून आणली होती. तर केंद्रात गेल्यानंतर मतदान करण्याऐवजी या तरूणानं ईव्हीएम मशिनवर कुऱ्हाडीचे घाव घालत मशिनची तोडफोड केली.
या घटनेनंतर मतदारसंघात एकच खळबळ उडाली. तसेच या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या तरूणाला ताब्यात घेतलं. मात्र, या तरूणानं हे कृत्य का केलं याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये. तर सध्या पोलीस या तरूणाची चौकशी करत आहेत.