पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पुन्हा एकदा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. ममता बॅनर्जी या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दुर्गापूरमध्ये आल्या होत्या. तेथून त्या इतर ठिकाणी एका सभेसाठी हेलिकॉप्टरमधून जाणार होत्या. ममता हॅलिकॉप्टरमध्ये बसण्यासाठी पायऱ्या चढत असताना त्यांचा पाय निसटला अन् त्यांचा तोल गेला. त्या समोरच्या बाजूला पडल्या. या अपघातात त्यांना किरकोळ जखम झाली असल्याचे वृत्त समोर आले आहे.
दरम्यान, ममता यांचा दीड महिन्यांपूर्वीच एक अपघात झाला होता. यात त्या जखमी झाल्या होत्या. , ममता बॅनर्जी या घरात पडल्या होत्या. या अपघातात त्यांचा कपाळमोक्ष झाला असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ११ मार्च रोजीची ही घटना आहे. त्यानंतर आता ४४ दिवसांनी ममता पुन्हा जखमी झाल्या आहेत.
गेल्या काही काळापासून ममता बॅनर्जी यांच्याबाबतीत अपघातांची मालिका सुरु असल्याचे दिसत आहे. जानेवारी 2024 मध्ये त्या स्वतःच्या गाडीतून प्रवास करत असताना कारचा ब्रेक जोरात लागल्यामुळे ममता बॅनर्जी समोरच्या बाजूला जोरात आपटल्या होत्या. तेव्हाही त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती.आपल्याला त्या अपघातात मृत्यूनेच गाठले असते, अशी प्रतिक्रिया पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्यानंतर व्यक्त केली होती.
तर 2021 मध्ये पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक सुरु असताना ममता बॅनर्जी यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. तसेच 2023 मध्येही त्यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले होते. तेव्हादेखील ममता बॅनर्जी यांच्या डाव्या गुडघ्याला आणि पाठीला दुखापत झाली होती.