लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. हातकणंगले आणि कोल्हापूरचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने आणि संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरातील सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी विकासाच्या आणि अन्य मुद्द्यांवरून विरोधकांवर टीका केली आहे.
कोल्हापूरच्या सभेला संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ”ही लढाई महायुती किंवा महाविकास आघाडीची नाही. तर ही लढाई नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे. देश कोणाच्या हातात सुरक्षित राहील हे ठरविण्याची ही लढाई आहे. कोल्हापूरच्या जनतेने ठरवले आहे, की मान देऊयात गादीला आणि मत देऊयात मोदींना. आमचे सरकार असताना आम्ही कोल्हापूरला टोलमुक्त केले. कोल्हापूर हा देशभक्त लोकांचा जिल्हा आहे. हा जिल्हा देशभक्तांच्या मागे उभा राहणारा आहे. आजचा भारत शत्रूला घरात घुसून मारणारा आहे. करोना काळात १४० कोटी देशवासियांना मोदीजींनी मोफत लस दिली.”
दरम्यान महायुतीने लोकसभा निवडणुकीसाठी हातकणंगले मतदारसंघातून विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना तिकीट दिले आहे. तर कोल्हापुरातून देखील विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना तिकीट देण्यात आले आहे. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार धनंजय महाडिक आणि अन्य महायुतीचे नेते उपस्थित होते.