JP Nadda : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. संदेशखळीच्या मुद्द्यावर जेपी नड्डा यांनी ममता सरकावर (टीएमसी) जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी बंगालमध्ये भाजप 35 पेक्षा जास्त जागा जिंकणार असल्याचा दावाही केला.
जेपी नड्डा म्हणाले, “ममता बॅनर्जींच्या सरकारमधील टीएमसीचे शाहजहान शेख सारखे लोक संदेशखळीतील महिलांच्या अस्तित्वाला कसे धोका निर्माण करत आहेत हे आम्ही पाहिले आहे. संदेशखळी येथे महिलांच्या सुरक्षेसाठी संदेश देणाऱ्या केंद्रीय तपास यंत्रणांवर हल्ले झाले. संदेशखळी येथे तपासादरम्यान सीबीआयने तीन विदेशी रिव्हॉल्व्हर, पोलिसांनी वापरलेले 1 रिव्हॉल्व्हर, 1 विदेशी पिस्तुल, अनेक गोळ्या आणि काडतुसे जप्त केली. NSG कमांडोही लोकांच्या सुरक्षेसाठी संदेशखळी येथे गेले होते.”
“ममता बॅनर्जी यांचे सरकार पश्चिम बंगालमध्ये कशी अराजकता पसरवत आहे, हे इथून तुम्हाला समजेल. जनता ममता सरकारला उत्तर देईल. भाजप येथे 35 पेक्षा जास्त जागा जिंकणार आहे”, असा विश्वास जेपी नड्डा यांनी व्यक्त केला.