Prakash Shendge : सांगली लोकसभा मतदारसंघात एक खळबळजनक प्रकार घडला आहे. ओबीसी बहुजन पार्टीकडून सांगली लोकसभा मतदारसंघात प्रकाश अण्णा शेंडगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर काल रात्री (27 एप्रिल) प्रकाश शेंडगे यांच्या गाडीवर काही अज्ञातांनी शाई फेक करत त्यांच्या गाडीला चप्पलांचा हार घातल्याचा प्रकार घडला. तसेच यावेळी एक पत्रक देखील लावण्यात आले. त्यामध्ये शेंडगेंना धमकी देण्यात आली आहे.
काल रात्री हॉटेल ग्रेट मराठासमोर प्रकाश शेंडगे यांची गाडी उभी होती. यावेळी काही अज्ञातांकडून हा प्रकार करण्यात आला. शेंडगेंच्या गाडीच्या काचेवर धमकी वजा इशारा देण्यात आला, ज्यात म्हटले आहे की, प्रकाश शेंडगे तुला मराठा समाज पाडल्याशिवाय गप्प बसणार नागी. छगन भुजबळांनी जशी नाशिक लोकसभा मतदारसंघामधून माघार घेतली, तशी तू माघार घे. मराठ्यांच्या नादी लागू नका नाहीतर तुला महाराष्ट्राच फिरू देणार नाही.
जर मराठ्यांना विरोध केला तर पुढच्या वेळी चपलेचा हार गळ्यात घालू. एक मराठा लाख मराठा, असे पत्रकावर लिहिले आहे. तसेच हे धमकीचे पत्रक प्रकाश शेंडगेंच्या गाडीच्या काचेवर चिकटवले आहे.
दरम्यान, या प्रकरानंतर मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी या प्रकराचा निषेध केला आहे. मराठ्यांना बदनाम करण्याचे हे षडयंत्र आहे. असे प्रकार मराठे करणार नाहीत. तसेच काहीजण असे आहेत की ते स्वत: करतात आणि मराठ्यांवर नाव घालतात, असा आरोप मनोज जरांगेंनी केला.