Gurucharan Singh Missing : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील रोशन सिंग सोढीची भूमिका साकारणारा अभिनेता गुरूचरण सिंग हा मागील काही दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. 22 एप्रिलपासून गुरूचरण सिंग बेपत्ता आहे. गुरूचरण सिंगचे 22 एप्रिल रोजी दिल्लीवरून मुंबईसाठीचे सकाळी आठचे फ्लाईट होते. पण, गुरूचरण सिंग हा विमानतळावर पोहोचलाच नाही. तर तो बेपत्ता झाल्याच्या बातमीनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. यामध्ये आता या प्रकरणात पोलिसांच्या हाती काही महत्त्वाची माहिती लागली आहे.
गुरूचरण सिंगचे दिल्लीच्या पालम परिसरातील शेवटचे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तो रस्त्याच्याकडेने एकटा चालताना दिसत आहे. यावेळी त्याच्या पाठीवर एक बॅग देखील दिसत आहे. तर धक्कादायक म्हणजे गुरूचरण सिंगचे हे शेवटचे लोकेशन असून त्यानंतर तो बेपत्ता झाला.
पोलीस तपासात समोर आले आहे की, गुरूचरण सिंगने दिल्लीच्या एका एटीएमवरून सात हजार रूपये काढले होते. तसेच गेल्या काही दिवसांपासून गुरूचरण सिंग हा आर्थिक संकटात होता. एवढंच नाही तर त्याचे लग्न देखील काही दिवसांवर होते. तर तो दुसरीकडे रूग्णालयात उपचार घेऊन आराम करत होता.
https://twitter.com/ndtvindia/status/1784140640491585938
दरम्यान, समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार गुरूचरण सिंग हा मुंबईकडे न जाता तो दिल्लीतच असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच गुरूचरणचे अपहरण झाल्याचा अंदाज सध्या लावला जात आहे. त्यामुळे आता पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.