हैदराबाद, तेलंगणा येथील एका शैक्षणिक संस्थेत एका कार्यक्रमाला संबोधित करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) प्रमुख मोहन भागवत म्हणाले की, आरएसएस सुरुवातीपासूनच संविधानानुसार सर्व आरक्षणांना पाठिंबा देत आहे, परंतु काही लोक खोटे व्हिडिओ प्रसारित करत आहेत.
आरक्षण हे आवश्यक असेल तोपर्यंत वाढवावे, असे संघाचे मत आहे. काही गटांना दिलेल्या आरक्षणाला संघ परिवाराने कधीच विरोध केला नाही, असे मोहन भागवत म्हणाले.
गेल्या वर्षी मोहन भागवत यांनी नागपुरात सांगितले होते की, जोपर्यंत समाजात भेदभाव आहे, तोपर्यंत आरक्षण कायम राहिले पाहिजे. भेदभाव जरी अदृश्य असला तरीही तो समाजात अस्तित्वात आहे. आरक्षणाबाबत भाजप आणि काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या शाब्दिक युद्धाच्या पार्श्वभूमीवर मोहन भागवत यांचे हे वक्तव्य केले होते.
दरम्यान, मध्य प्रदेशातील एका सभेत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला ‘ओबीसी समाजाचा सर्वात मोठा शत्रू’ म्हणून संबोधले आणि म्हटले की, काँग्रेसने पुन्हा एकदा कर्नाटकमध्ये मागच्या दाराने ओबीसींसह सर्व मुस्लिम जातींचा समावेश करून धार्मिक आधारावर आरक्षण दिले आहे. या निर्णयामुळे ओबीसी समाजाला आरक्षणाच्या महत्त्वपूर्ण भागापासून वंचित ठेवण्यात आले आहे.
जेव्हा यावरून वाद वाढला तेव्हा कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, काँग्रेसने मागासवर्गीयांचे आरक्षण मुस्लिमांना हस्तांतरित केल्याचा दावा करणे हे उघड खोटे आहे. माजी पंतप्रधान देवेगौडा अजूनही मुस्लिमांच्या कोट्याच्या पाठिंब्यावर उभे आहेत की नरेंद्र मोदींना शरण गेले आहेत, असा सवालही त्यांनी केला. कारण देवेगौडांनी त्याची सुरुवात केली होती. एकेकाळी मुस्लिमांना आरक्षण लागू करण्याचा दावा करणारे देवेगौडा आजही आपल्या भूमिकेवर ठाम आहेत का, असा सवाल सिद्धरामय्या यांनी केला. की नरेंद्र मोदींना शरण जाऊन त्यांची पूर्वीची भूमिका बदलणार? हे त्यांनी राज्यातील जनतेला स्पष्ट करावे, असेही सिद्धरामय्या म्हणाले.