Manoj Jarange Patil – Pankaja Munde : सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार प्रचार केला जात आहे. अनेक बडे नेते राज्यांमध्ये, जिल्ह्यांमध्ये जाऊन सभा घेताना दिसत आहेत. अशातच आता बीड जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि बीड लोकसभा मतदारसंघाच्या भाजप उमेदवार पंकजा मुंडे हे आमनेसामने आल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातला.
पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे या दोघांनी एकाचवेळी बीड जिल्ह्याचे आराध्य दैवत असलेल्या नारायणगडाच्या फिरत्या नारळी सप्ताहामध्ये सिरसमार्ग येथे हजेरी लावली होती. हे दोघेही एकाच व्यासपीठावर आल्यामुळे दोघांच्या कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातला. या गोंधळ घालण्यामागचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी केलेलं वादग्रस्त विधान.
उपोषण करून आरक्षण मिळत नसतं, असं विधान पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. पण नंतर त्यांनी असं वक्तव्य केलं नसल्याची कबुली दिली होती. मात्र, तरी देखील पंकजा मुंडेंवर मराठा समाजाची नाराजी दिसून आली. नारायणगडाच्या फिरत्या नारळी सप्ताहामध्ये मनोज जरांगेंच्या आणि पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली. नंतर दोघांनी आपल्या कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं त्यामुळे परिस्थिती निवळली.