Gurucharan Singh Missing : प्रसिद्ध टीव्ही शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चा अभिनेता गुरुचरण सिंग बेपत्ता झाला आहे. शोमध्ये ‘रोशन सिंग सोधी’ची भूमिका साकारणारा गुरुचरण सिंगचे 22 एप्रिल रोजी दिल्लीवरून मुंबईसाठीचे सकाळी आठचे फ्लाईट होते. पण, गुरूचरण सिंग हा विमानतळावर पोहोचलाच नाही. त्या दिवसापासून त्याचा ठावठिकाणा माहितीत नाही. आतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे की, अभिनेता गुरचरण सिंगने मुंबईला जाण्यासाठी कोणतेही विमान घेतले नव्हते. त्याच्या लग्नाबाबतही पोलिसांना माहिती मिळाली आहे. तपासात एटीएमचे ठिकाण आणि त्याचे शेवटचे ठिकाणही उघड झाले आहे.
‘इंडिया टुडे’च्या रिपोर्टनुसार, गुरचरण सिंग लवकरच लग्न करणार होता. तपासात लग्नाव्यतिरिक्त आर्थिक संकटाची बाबही समोर आली आहे. गुरुचरण सिंग हा आर्थिक संकटातून जात असल्याची माहिती मिळत आहे. दिल्लीतील अनेक भागात लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये तो कैद झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तो बॅग घेऊन रस्त्याने चालत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
गुरुचरण सिंग याने त्याच्या एटीएममधून 7 हजार रुपये काढल्याचेही पोलिसांनी सांगितले. पोलिसांनीही सीसीटीव्ही फुटेजवरून याला दुजोरा दिला आहे. दिल्ली पोलिसांनी सोढीचा फोन ट्रेस करण्याचा प्रयत्न केला. दिल्लीतील पालम येथे त्याचे शेवटचे लोकेशन दाखवण्यात आले. त्याचं घरही तिथेच आहे. 24 एप्रिलनंतर त्यांचा फोन बंद आहे. 22 एप्रिलच्या रात्री तो घरातून निघून गेला होता.
गुरुचरण सिंग बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या वडिलांनी पालम पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. वास्तविक गुरुचरण मुंबईला जाण्यासाठी घरातून निघाले होता पण ते मुंबईला पोहोचला नाही. तो घरीही परतला नाही. या घटनेनंतर सोढीचे चाहते दु:खी झाले आहेत.