AAP : आम आदमी पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी एक गाणे तयार केले आहे. मात्र, हे गाणे प्रचारासाठी वापरण्यास निवडणूक आयोगाने आप पक्षाला मनाई केली आहे. कारण या गाण्यात तिहार तुरूंगामध्ये बंद असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना दाखवण्यात आले आहे.
आप पक्षाचे हे गाणे आमदार दिलीप पांडे यांनी लिहिले आहे. हे गाणे अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि अन्य आप नेत्यांच्या अटकेला विरोध करणारे आहे. आप पक्षाने काही दिवसांपूर्वीच हे गाणे जारी केले होते.
‘तुरूंगाचे उत्तर मतांद्वारे’ असा या गाण्याचा आशय आहे. या गाण्यामध्ये आप नेत्यांच्या अटकेचा व्हिडीओ आणि काही छायाचित्रे वापरण्यात आली आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने हे गाणे वापरण्यास मनाई केली आहे. कारण निवडणूक आयोगाच्या नोटिशीनुसार या गाण्यामधून सत्ताधारी पक्ष आणि तपास संस्थांची खराब प्रतिमा दाखवण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाने मनाई केल्यानंतर आप नेत्या आतिशी म्हणाल्या की, आमच्या प्रचार गाण्यामध्ये कुठेही भाजपचे नाव घेण्यात आलेले नाही. निवडणूक आयोगाने ‘तुरूंगाचे उत्तर मतांद्वारे’ या वाक्याला आक्षेप घेतला आहे. पण त्यामध्ये काहीही असे आक्षेपार्ह नसून आचारसंहितेचा भंग झालेला नाही.