BJP : दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि प्रमुख नेत्यांसह समुदायातील सुमारे 1,000 व्यक्तींनी शनिवारी (27 एप्रिल) भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी हा ऐतिहासिक क्षण असल्याचे म्हटले आहे. तसेच विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी मोदी सरकारच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली.
भाजप मुख्यालयात जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत पक्षाचे सदस्यत्व घेतलेल्या सदस्यांमध्ये दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे सदस्य भूपेंद्र सिंग गिन्नी, रमनदीप सिंग थापर, परविंदर सिंग लकी, मनजीत सिंग औलख, रमनज्योत सिंग, जस्मिन सिंग नौनी आणि हरजीत सिंग पप्पा यांचा समावेश होता. तर इतर सर्व सदस्यांना सदस्यत्वाच्या स्लिप देऊन भाजप परिवारात समाविष्ट करण्यात आले. यावेळी देशाच्या विकासाच्या वाटचालीत योगदान देण्याच्या संकल्पाचा सर्वांनी एकमताने पुनरुच्चार केला.
यावेळी जेपी नड्डा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोककल्याणकारी धोरणांमुळे प्रभावित होऊन प्रत्येक वर्गातील आणि प्रत्येक समाजातील लोक पक्षात सामील होत आहेत. मोदी सरकारने शीख बांधवांच्या विकासासाठी, वारसा आणि न्यायासाठी अनेक कामे केली आहेत. दिल्ली आणि पंजाबसह संपूर्ण शीख समुदायाच्या प्रगतीसाठी आम्ही एकत्र काम करू. तर दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांसह भाजपमध्ये सामील झालेल्या सर्व व्यक्तिमत्त्वांना विकसित भारताचा पंतप्रधानांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी योगदान द्यायचे आहे, असेही जेपी नड्डा म्हणाले.