कर्नाटक चामराजनगरचे भाजपा खासदार व्ही श्रीनिवास प्रसाद यांचं रविवारी मध्यरात्री बंगळुरुतील एका खासगी रुग्णालयात निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या चार दिवसांपासून ते आयसीयूमध्ये दाखल होते.
२२ एप्रिल रोजी व्ही श्रीनिवास प्रसाद यांना बंगळुरूतील मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांचे निधन झाले. अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव मैसुरू येथील जयलक्ष्मीपुरम आवास येथे आणले जाणार आहे.
व्ही. श्रीनिवास प्रसाद यांनी १९७६ मध्ये जनता पक्षातून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. पुढे १९७९ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. इतकेच नाही तर ते काही काळ जेडीएस, जेडीयू आणि समता पक्षाचे सदस्यही होते. नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. श्रीनिवास यांनी केंद्र सरकारपासून राज्यापर्यंत अनेक महत्त्वाची पदे दीर्घकाळ भूषवली होती. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय राज्यमंत्रीपद भूषवले होते. २०१९ मध्ये श्रीनिवास यांना भाजपासाठी चामराजनगरमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. जिथून ते विजयी झाले. गेल्या काही दिवसांपूर्वीच व्ही. श्रीनिवास प्रसाद यांनी राजकारणात संन्यास घेत असल्याची घोषणाही केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्ही. श्रीनिवास प्रसाद यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत एक्स वर पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ते म्हणाले आहेत की
“ज्येष्ठ नेते आणि चामराजनगरचे खासदार, श्री व्ही. श्रीनिवास प्रसाद जी यांच्या निधनाने मला अत्यंत दुःख झाले आहे. ते सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते होते, त्यांनी आपले जीवन गरीब, दलित आणि उपेक्षितांच्या कल्याणासाठी समर्पित केले होते. समाजसेवेच्या विविध कार्यांसाठी ते खूप लोकप्रिय होते. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि कार्यकत्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, ओम शांती…”