आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने साताऱ्यात असणार आहेत. मोदींची कराडमध्ये तर शरद पवार यांची वाईत सभा पार पडणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे भाजपने सातारा लोकसभा मतदारसंघ राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिलेली आहे. उदयनराजे भोसले आणि सांगलीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कराडमध्ये सभा होणार आहे. तर, शरद पवार सुद्धा साताऱ्याच्या दौऱ्यावर असून ते शशिकांत शिंदे यांच्यासाठी सभा घेणार आहेत.पंतप्रधानांच्या सभेला सातारा लोकसभा मतदारसंघातील तसेच सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजप आणि महायुतीच्या घटकपक्षांचे नेते कार्यकर्ते उपस्थित राहतील.
गेले २ दिवस शरद पवार सातारा परिसरात प्रचार सभा घेत आहेत. तसेच माढा लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचार सभेसाठी दहिवडीत होते. तसेच त्यांनी शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ साताऱ्याच्या पाटणमध्ये जाहीर सभा घेतली.त्यावेळी शरद पावर यांनी “नरेंद्र मोदींच्या राज्यात महागाई वाढली. भारतात 100 पैकी 87 तरुणांना काम नाही. स्वतः काय केलं ते मोदी सांगत नाहीत, असे म्हणत नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
आता आजच्या सभांमध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे एकमेकांवर कसे टीकेचे बाण सोडणार , मतदारांना कोणती आश्वासने देणार ,आणि कोणाची सभा जास्त गर्दी खेचणार हे ह्याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.