PM Narendra Modi In Pune : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बड्या नेत्यांकडून सर्व राज्यांमध्ये जोरदार प्रचार केला जात आहे. यामध्ये आज (29 एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पुण्यात येणार आहेत. पुण्यात पंतप्रधान मोदी जनतेला संबोधित करणार आहे. त्यामुळे आजच्या या सभेत पंतप्रधान मोदी कोणावर निशाणा साधणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आज संध्याकाळी साडे पाच ते सहाच्या दरम्यान पंतप्रधान मोदी पुण्यात दाखल होणार आहेत. या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महायुतीतील घटक पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. मोदींच्या या सभेसाठी दीड ते दोन लाख नागरिकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तर 35 हजार लोकांना या सभेसाठी विशेष निमंत्रण देण्यात आले आहे.
पंतप्रधान मोदींच्या आजच्या सभेनिमित्त पुणे शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. आज दुपारी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. तर काही मार्गांसाठी सर्व वाहनांसाठी प्रवेश बंद करण्यात येणार आहेत.
रेसकोर्स परिसरातील पाण्याची टाकी ते टर्फ क्लब चौक रस्तावर दुहेरी वाहतूक केली जाणार आहे. तर टर्फ क्लब मुख्य प्रवेशद्वार ते टर्फ क्लब चौक रस्त बंद राहणार आहे. तसेच सोलापूर रस्त्यावरील अर्जुन रस्ता जंक्शन ते टर्फ क्लब मुख्य प्रवेशद्वार हा रस्ताही बंद राहणार आहे. दुसरीकडे गोळाबार मैदान ते भैरोबानाला हे रस्ते तात्पुरत्या स्वरूपात बंद राहणार आहेत.
या पर्यायी मार्गांचा करा वापर
पुणेकरांना आता पर्यायी मार्ग दिले असून त्याचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. मम्मादेवी जंक्शन ते बेऊर रस्ता जंक्शन येथून तुम्ही इच्छित स्थळी जाऊ शकता.