हवामान विभागाने राज्याच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे. हवामानखात्याने राज्यातील नागरिकांनाही दक्षतेचा इशारा दिला आहे.
महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यातील काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. 27 एप्रिल ते 29 एप्रिलपर्यंत कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. या काळात नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण किनारपट्टीसह राज्याच्या बहुतांश भागांत रविवारी उष्णतेची लाट परतली आहे. . अनेक भागांत कमाल तापमानाचा पारा ३५ ते ४० अंशांच्या वर गेल्यामुळे काहिली वाढली आहे. तर उन्हाळय़ाच्या सुट्टीत अनेकांची आवडती थंड हवेची ठिकाणे, महाबळेश्वर आणि माथेरानमध्येही उकाडा वाढल्यामुळे शनिवारी-रविवारी तेथे गेलेल्यांची निराशा झालेली दिसून आली,
थंड हवामानाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरामचे कमाल तापमान रविवारी मुंबईपेक्षाही जास्त नोंदविले गेले. मुंबईपासून जवळ असलेल्या रायगड जिल्ह्यातील या ‘हिल स्टेशन’वर तब्बल ३९ अंश कमाल तापमानाची नोंद झाली. तसेच सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्येही ३४.१ अंश तापमानाची नोंद झाली. त्यामुळे शहराच्या उकाडय़ापासून बचावासाठी तेथे गेलेल्या पर्यटकांचा प्रचंड विरस झाला.
तर राज्यातील सर्वाधिक सरासरी कमाल तापमानाची नोंद रविवारी ४३.७ अंश सेल्सिअस सोलापूर येथे झाली. जळगाव (४२.२), मोहोळ (४२.५), नांदेड (४२.४), सांगली (४१), सातारा (४०.५) येथेही तापमान जास्त होते. कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ येथे कमाल व किमान तापमानात वाढ झाली. तसेच पुढचे काही दिवस काही भागात कमाल तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअस राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.