Annamalai : ऑक्टोबर 2022 मध्ये ख्रिश्चनांच्या विरोधात द्वेषयुक्त भाषण दिल्याबद्दल तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष के अन्नामलाई यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या फौजदारी खटल्याच्या सुनावणीवर सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेली स्थगिती वाढवली.
न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने स्थगितीचा आदेश वाढवला आणि तक्रारदाराला सहा आठवड्यांत उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे.
“अंतरिम आदेश सुरू राहील. हे प्रकरण 9 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात पुन्हा सूचीबद्ध केले जाईल,” असे खंडपीठाने सांगितले. तर सर्वोच्च न्यायालयाने 26 फेब्रुवारी रोजी अण्णामलाई यांच्यावरील फौजदारी खटल्याच्या कारवाईला स्थगिती दिली होती.
तक्रारदार व्ही पीयूष यांनी अन्नामलाई यांच्यावर द्वेषपूर्ण भाषण दिल्याचा आरोप केला होता. या संदर्भात 22 ऑक्टोबर 2022 रोजी मुलाखतीत अन्नामलाई यांनी ख्रिश्चनांच्या विरोधात द्वेषपूर्ण भाषण दिल्याचा आरोप केला होता.
अण्णामलाई यांनी 8 फेब्रुवारीच्या मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते ज्याने त्यांना या प्रकरणात जारी केलेले समन्स रद्द करण्यास नकार दिला होता. पीयूष यांच्या तक्रारीच्या आधारे ट्रायल कोर्टाने हे समन्स बजावले होते.
एका YouTube मुलाखतीत अण्णामलाई यांनी सांगितले होते की, हिंदूंना फटाके फोडण्यापासून रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात खटले दाखल करून हिंदू संस्कृती नष्ट करण्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर अर्थसहाय्यित ख्रिश्चन मिशनरी एनजीओचा सहभाग आहे.
समन्स आणि संपूर्ण कार्यवाहीला आव्हान देतान अन्नामलाई यांनी सांगितले होते की, त्यांची भाषणे संतापाची अभिव्यक्ती होती आणि त्यांचा हेतू जातीय तेढ वाढवण्याचा नव्हता आणि मुलाखतीच्या जवळपास 400 दिवसांनंतर तक्रार दाखल करण्यात आली होती, ज्या दरम्यान कोणतीही अप्रिय घटना घडली नाही.