दिल्लीतील दारू घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या कोठडीत आहेत. २१ मार्च रोजी त्यांना ईडीने अटक केली होती. सध्या त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान त्यांच्या या प्रकरणावर सध्या कोर्टात सुनावणी सुरु आहे. दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यासंदर्भात सोमवारी (२९ एप्रिल) सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांना अनेक महत्वाचे प्रश्न विचारले.
केजरीवाल यांच्या अटकेविरोधात दाखल याचिकेवर सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने केजरीवाल यांचे वकील सिंघवी यांना विचारले की, तुम्ही अटक आणि रिमांडच्या विरोधात आहात, तर तुम्ही जामिनासाठी अर्ज का केला नाही? यावर केजरीवाल यांच्या वकिलाने सांगितले की, आम्ही अटक बेकायदेशीर मानतो, त्यामुळे आम्ही जामिनासाठी अर्ज केला नाही. एवढेच नाही तर तुम्हाला नोटीस पाठवण्यात आली आहे का, अशी विचारणा न्यायालयाने सिंघवी यांना केली. त्याच्याकडे दुर्लक्ष का केले?