Ravindra Waikar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रवींद्र वायकरांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. शिवसेनेकडून रवींद्र वायकर यांना मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. शिवसेनेच्या अधिकृत सोशल मीडिय हँडलवरून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता रवींद्र वायकर हे ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांना लढत देणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे हे मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तर आता अखेर शिंदेंनी त्यांच्या अधिकृत उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे.
सोमवारी (29 एप्रिल) रात्री रवींद्र वायकर हे उशीरापर्यंत एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानी होते. यावेळी दोघांमध्ये बराच काळ चर्चा झाली. तर या बैठकीमध्ये उत्तर-पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकरांना उमेदवारी देण्याचे निश्चित झाले.
या मतदारसंघातून आता रवींद्र वायकर विरूद्ध अमोल किर्तीकर अशी लढत आता पाहायला मिळणार आहे. अमोल किर्तीकर हे विद्यमान खासदार गजानन किर्तीकर यांचे पुत्र आहेत.