Jitender Singh Shunty : खलिस्तानी अतिरेक्याकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर भाजपचे माजी आमदार जितेंद्र सिंह शंटी यांनी सोमवारी दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
पद्मश्री पुरस्कार विजेते शंटी यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, त्यांना सोमवारी एक व्हॉट्सॲप कॉल आला ज्यादरम्यान ज्यादरम्यान कॉलरने पंजाबी भाषेत बोलून त्यांना आणि त्यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली.
“मला व्हॉट्सॲपवर एक कॉल आला ज्या दरम्यान कॉलरने मला आणि माझा मुलगा सरदार ज्योती जीतला ठार मारण्याची धमकी दिली,” असे शंटी यांनी सोमवारी शाहदरा उपायुक्त आणि विवेक विहार एसएचओ यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
एएनआयशी बोलताना शंटी यांनी सांगितले की, फोन डिस्कनेक्ट करण्यापूर्वी कॉलर सुमारे 35-40 सेकंद माझ्याशी बोलला. यावेळी कॉलरने माझ्यावर आणि त्याच्या मुलावर “खलिस्तानच्या विरोधात बरेच काही” बोलल्याचा आरोप केला.
“काल, दुपारी 12.59 वाजता मला एक व्हॉट्सॲप कॉल आला ज्यामध्ये पंजाबी भाषेत खलिस्तान समर्थक बोलत होते. तुम्ही आणि तुमचा मुलगा खलिस्तानविरोधात खूप बोलत आहात. आता तुमची शेवटची वेळ आली आहे. फोन डिस्कनेक्ट करण्यापूर्वी ती व्यक्ती सुमारे 35 ते 40 सेकंद बोलली”, असे शंटी यांनी एएनआयला सांगितले.
आपल्या पत्रात शंटी यांनी कट्टरपंथी अतिरेकी संघटनांचे लक्ष्य असल्याचा आणि ‘सतत धोक्यात’ असल्याचा दावा केला आहे. तसेच खलिस्तान समर्थक अतिरेक्यांनी हल्ला केल्याची भीती त्यांनी आपल्या पत्रात नमूद केली आहे.
ते पुढे म्हणाले की, त्यांचा मुलगा दिल्लीत भाजपचा प्रवक्ता आहे आणि तो खलिस्तानी दहशतवादाच्या विरोधात टेलिव्हिजन मुलाखती तसेच इतर व्यासपीठांवर बोलत आहे. अलीकडेच दिल्लीच्या कॅनॉट प्लेसमध्ये खलिस्तानच्या विरोधात फलक धारण करतानाचा त्याचा व्हिडिओ जगभरात व्हायरल झाला आहे, असेही शंटी यांनी सांगितले.
शंटी हे शहीद भगतसिंग सेवा दल आणि शहीद-ए-आझम भगतसिंग फाउंडेशनचे संस्थापक आहेत. 2008 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि 2013 मध्ये शाहदरा येथून दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकली. तर कोविड-19 साथीच्या काळात त्यांच्या परोपकारी सेवांसाठी शंटी यांना 2021 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर त्यांनी नागरी सन्मान त्यांच्या सहकारी आघाडीच्या कार्यकर्त्यांना समर्पित केला.