लोकसभा निवडणुकीत २६ एप्रिलला झालेल्या मतदानाच्या प्रक्रियेदरम्यान स्वत:चे मतदान कोणाला केले, याची फोटो व व्हिडीओ काही अतिउत्साही मतदारांनी काढले व समाजमाध्यमांवर व्हायरल केले, त्यामध्ये मतदानाच्या गोपनियेचा भंग झाल्याने चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश अमरावतीचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सौरभ कटियार यांनी पोलिस यंत्रणेला दिले आहेत.
लोकशाही प्रणालीमध्ये मताच्या गोपनीयतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे व याविषयीचा कायदादेखील आहे. त्याचे नियमाचे उल्लंघन झाल्यास कारवाई केल्या जाते. यासाठी पोलिसांची यंत्रणा काम करते. किंबहुना निवडणूक दरम्यान अशा प्रकारे कायद्याचे उल्लंघन होत असल्याच त्यावर लक्ष ठेऊन कारवाई करण्यासाठी एक कक्षदेखील असतो. या कक्षाचे प्रमुख अतिरिक्त जिल्हाधिकारी सूरज वाघमारे आहेत. त्यांना याविषयी विचारणा केली असता मतदानाच्या गोपनीयतेचा भंग झाल्याची कोणतीही तक्रार दाखल नसल्याचे त्यांनी सांगितले.
मतदान केंद्रात मोबाइल वापरास मनाई
मतदान केंद्रांचे १०० मीटर आत मोबाइल वापरास मनाई असताना येथे मतदान केंद्राच्या आत मोबाइल नेण्यात आला व कुठल्या उमेदवाराला मतदान करीत आहे. याबाबतचे फोटो व व्हिडीओ काढण्यात आला नंतर तो समाजमाध्यमांवर व्हायरल करण्यात आला. त्यामुळे संबंधित मतदान केंद्रावरील अधिकारी, कर्मचारी व पोलिस काय करत होते, हा प्रश्न या निमित्ताने चर्चेत आला आहे.
तीन महिन्यांची कैद किंवा दंडाची तरतूद
मतदानाची गोपनीयता भंग झाल्यास लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ चे कलम १२८ अन्वये तीन महिन्यांची कैद किंवा दंड किंवा एकाचवेळी दोन्ही शिक्षा असे कायद्यात तरतूद असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजीराव शिंदे यांनी ‘दिली, याबाबत अद्याप तक्रार प्राप्त नसल्याचे ते म्हणाले.मतदानाची गोपनीयता भंग झाल्याबाबत अद्याप तक्रार प्राप्त नाही, परंतु याबाबतचा तपास करुन असे फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश पोलिस यंत्रणेला दिले आहेत.