PM Narendra Modi : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या प्रचार सभांचा तडाखा सुरू आहे. सध्या ते दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदींची माळशिरसमध्ये जाहीर सभा होत आहे. माळशिरसमधून महायुतीचे उमेदवार रणजित सिंह निंबाळकर निवडणूक लढवत आहेत. तर निंबाळकरांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी मैदानात उतरले आहेत. या प्रचार सभेला संबोधित करताना पंतप्रधानांनी शरद पवारांवर (Sharad Pawar) जोरदार हल्लाबोल केला. त्या नेत्याची निवडणूक लढवण्याची हिंमत नाही, असं म्हणत मोदींनी पवारांवर निशाणा साधला.
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, “महाराष्ट्रातील जनता जेव्हा आम्हाला प्रेम, आशीर्वाद देते तेव्हा कसलीच कसर सोडत नाही. पण जर कोणी आपल्याला दिलेलं वचन पूर्ण केलं नाही तर हीच महाराष्ट्राची जनता ते बरोबर लक्षात ठेवते आणि वेळ आल्यावर बरोबर हिशोब चुकता करते, असं म्हणत पंतप्रधानांनी विरोधकांना इशारा दिला.”
पुढे त्यांनी शरद पवारांवर अप्रत्यक्षपणे टीका केली. “15 वर्षांपूर्वी एक मोठे नेते इथे निवडणूक लढवण्यास आले होते. त्यावेळी त्यांनी इथे दुष्काळाने प्रभावित क्षेत्रात पाणी पोहोचवू अशी शपथ मावळत्या सूर्याच्या साक्षीने घेतली होती. पण त्या नेत्याने पाणी दिलं का? वचन पाळलं का? नाही ना? त्यामुळे आता त्यांना शिक्षा देण्याची वेळ आली आहे. तसेच आज त्या नेत्याची इथून निवडणूक लढण्याची हिंमत नाही”, अशी टीका पंतप्रधान मोदींनी शरद पवारांवर केली.
काँग्रेसवर निशाणा साधताना ते म्हणाले, “60 वर्षांमध्ये काँग्रेस जे करू शकली नाही ते आम्ही करून दाखवलं आहे. आम्ही 25 कोटी लोकांना गरिबीतून मुक्त केलं आहे. त्यामुळे तुम्हाला तुमची संपत्ती लुटणारं सरकार हवं आहे का?” असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.