Sharad Pawar : सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. तर सोमवारी झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान मोदींनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. शरद पवार हे भटकती आत्मा असून त्यांनी राज्य अस्थिर ठेवले असल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केला होता. तर पंतप्रधानांच्या या आरोपाला शरद पवारांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. होय, मी भटकती आत्मा आहे, असं शरद पवार यावेळी म्हणाले.
शिरूरमध्ये अमोल कोल्हे यांच्या प्रचारसभेत बोलताना शरद पवार म्हणाले, माझ्या बोटाला धरून राजकारणात आलेले आता माझ्याबद्दल काय बोलत आहेत? एक आत्मा भटकत आहे, असं तुम्ही म्हणालात. त्या आत्म्यापासू सुटका व्हायला हवी, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. होय, मी भटकती आत्मा आहे आणि हा अस्वस्थ आत्मा स्वत:साठी नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, जनतेची महागाईतून सुटका करण्यासाठी आहे. त्यामुळे यासाठी मी शंभरवेळा अस्वस्थता दाखवेन. हे संस्कार यशवंतराव चव्हाण यांचे आहेत, असे शरद पवार म्हणाले.
पुढे ते म्हणाले, काल पंतप्रधान म्हणाले होते की ईडीचा मी एक टक्काही वापर करत नाही. पण जनतेचा ज्यांच्यावर विश्वास आहे त्यांनाच तुम्ही तुरूंगात टाकता. मग तुम्ही एक टक्का म्हणा की आणखी काही म्हणा. हुकूमशाहीच्या दिशेने तुम्ही जात आहात, अशी टीकाही शरद पवारांनी केली.