Nalasopara Fire : नालासोपारा येथे मोठी दुर्घटना घडली आहे. गॅसचा पाईप फुटल्याने हॉटेलला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. नालासोपारा पूर्वेकडील आचोळे रोड येथे पालिकेच्या गटाराचे काम सुरू होते. यावेळी गॅस लाईन तुटल्याने जोरदार स्फोट झाला आणि तेथील हॉटेलला भीषण आग लागली. या आगीत चार कर्मचारी गंभीर जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
आचोळे रोड येथील रस्त्यावर पालिकेचं आर.सी.सी गटाराचं काम सुरू होतं. यावेळी जेसीबीच्या सहाय्याने खड्डा खोदत असताना ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तेथून गेलेली गॅस पाईपलाईन तुटली. पाईपलाईन तुटल्यामुळे गॅसने पेट घेतला आणि जवळच असलेल्या हॉटेलला आग लागली. हॉटेलसोबतच शेजारी असलेल्या एम.एस.ई.बीच्या ट्रान्सफॉर्मरलाही आग लागली.
या घटनेत हॉटेलमधील चार कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. तर यातील एक कर्मचाऱ्याची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या या चौघांनाही नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सध्या या आगीच्या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. तर या घटनेची माहिती मिळताच अग्निमशन दलाच्या गाड्या तातडीनं घटनास्थळी दाखल झाल्या असून सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.