Goldy Brar : कालपासून (1 मे) सिद्धू मूसवाला हत्येचा कट रचल्याचा आरोप असलेला दहशतवादी गोल्डी ब्रारची हत्या झाली असल्याची बातमी समोर आली होती. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली होती. अशातच आता गोल्डी ब्रार अमेरिकेत ठार झाला असल्याच्या अफवेला पूर्णविराम मिळाला आहे.
अमेरिकेत कॅलिफोर्नियाच्या फ्रेस्नो पोलीस विभागाने गोल्डी ब्रारच्या मृत्यूच्या वृत्ताचे खंडन केले आहे. पोलिसांनी सांगितले की, गोल्डी ब्रारच्या हत्येबाबत सुरू असलेले वृत्त अजिबात खरे नाही. ही चुकीची माहिती इंटरनेट मीडिया आणि ऑनलाइन वृत्तसंस्थांवर पसरवली जात आहे.
ठार झालेला तरुण हा दहशतवादी गोल्डी ब्रार नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. कॅलिफोर्नियातील फेअरमॉन्ट हॉटेलच्या बाहेर मंगळवारी दोन तरुणांवर गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती आहे. या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तर पंजाब पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्याकडे गोल्डी ब्रारच्या हत्येबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही.
या घटनेत मरण पावलेल्या दोघांपैकी एकजण हा गोल्डी ब्रारसारखा दिसत होता. त्यामुळे तिथून जाणाऱ्या एका पंजाबी माणसाने गोल्डी ब्रारची हत्या झाल्याची अफवा पसरवली. एवढंच नाही तर गँगस्टर लखबीर सिंगने त्याच्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट करून दहशतवादी गोल्डी ब्रारच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे.