Uma Ramanan Passed Away : प्रसिद्ध तामिळ गायिका उमा रामनन यांचं निधन झालं आहे. त्यांनी 69व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. उमा रामनन यांच्या निधनानं संपूर्ण तामिळ चित्रपटसृष्टीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
उमा रामनन यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये. तर उमा रामनन यांच्या पश्चात त्यांचे पती, गायक ए.व्ही.रामनन आणि त्यांचा मुलगा विघ्नेश रामनन हे आहेत.
उमा रामनन या एक प्रसिद्ध शास्त्रीय गायिका होत्या. त्यांना त्यांच्या ‘निझलगल’ या तामिळ चित्रपटातील ‘पूंगाथावे थाल थिरावई’ने ओळख मिळवून दिली. त्यानंतर त्यांच्या कारकिर्दीला भरारी मिळाली. विशेष म्हणजे उमा यांनी 35 वर्षांमध्ये 6,000 हून अधिक मैफिलींमध्ये भाग घेतला होता.
1977 मध्ये उमा यांनी ‘श्री कृष्ण लीला’मधील गाण्याद्वारे संगीत क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यांनी हे गाणे त्यांचे पती ए.व्ही.रामनन यांच्यासोबत गायलं होतं. तसेच त्यांनी इलैयाराजासोबत 100 हून अधिक गाण्यांमध्ये काम केले आहे.