Brijbhushan Singh : उत्तर प्रदेशच्या कैसरगंज येथील भाजपच्या उमेदवारावरील सस्पेंस आता संपुष्टात आला आहे. कारण विद्यमान खासदार ब्रिजभूषण शरण सिंह या जागेवरून निवडणूक लढवणार नाहीत. भाजपने ब्रिजभूषण सिंह यांचे तिकीट कापले आहे. पक्षाने आता ब्रिजभूषण यांचा धाकटा मुलगा करण भूषण यांना तिकीट दिले आहे.
उमेदवारी मिळाल्यानंतर करण भूषण यांनी त्यांचे वडील आणि विद्यमान खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे आशीर्वाद घेतले. आशीर्वाद घेताना ब्रिजभूषण यांनी करण भूषण सिंह यांना उमेदवार बनवण्याबाबत त्यांच्या समर्थकांना सांगितले आणि त्यांना परिसरात प्रचार करण्यास सांगितले. तसेच करण भूषण उद्या सकाळी 11.00 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
कैसरगंज जागेवर ब्रिजभूषण यांची मजबूत पकड आहे. अशा स्थितीत त्यांच्या कुटुंबातील एकाला भाजप तिकीट देईल, अशी चर्चा आधीच सुरू होती. तसेच ब्रिजभूषण यांना स्वतः निवडणूक लढवायची होती मात्र महिला कुस्तीपटूंनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे त्यांची उमेदवारी धोक्यात आली होती.
दरम्यान, कैसरगंज जागेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 3 मे आहे. या जागेवर पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. पाचव्या टप्प्यात यूपीमधील मोहनलालगंज, लखनौ, रायबरेली, अमेठी, जालौन, झाशी, हमीरपूर, बांदा, फतेहपूर, कौशांबी, बाराबंकी, फैजाबाद, कैसरगंज आणि गोंडा येथे मतदान होणार आहे.