लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे रोजी होणार आहे. दरम्यान देशभरात सर्व पक्षांकडून प्रचार सभांचा धडाका लावला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशभरात आपल्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेत आहेत. दरम्यान आज नरेंद्र मोदी गुजरातमधील एका सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी हिंदू समाजाला विभाजित करण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्ष करत आहेत, असा आरोप मोदींनी यावेळी केला आहे. नरेंद्र मोदी गुजरातच्या सुरेंद्रनगर येथून बोलत होते.
सुरेंद्रनगर येथून बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ”काँग्रेस हिंदू समाजाला विभाजित करण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेस राम भक्त आणि शिव भक्त यांच्यात वाद निर्माण करू इच्छित आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांनी भगवान राम आणि भगवान शंकर यांच्याबद्दल एक गंभीर विधान केले आहे. चुकीच्या उद्देशाने ते विधान केले गेले आहे. हजारो वर्षांपासून चालत आलेली परंपरा, ज्याला मुघल देखील तोडू शकले नाहीत, आता काँग्रेस ते तोडू इच्छिते.”
मोदी पुढे म्हणाले, ”एक महिन्याआधी काँग्रेसचे युवराज म्हणाले होते की शक्ती चा नाश करू. आम्ही शक्तीचे उपासक आहोत. शक्तीचे भक्त युवराजांना माफ करू शकतात का? काँग्रेस तुष्टीकरणासाठी किती खालच्या पातळीवर जाणार आहे? आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांचे सत्य बाहेर आल्याने काँग्रेस पक्षच संतुलन बिघडले आहे. दरम्यान काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर देखील मोदी टीका करताना दिसत आहे. तर धार्मिक आधारावर आरक्षण लागू होऊन देणार नाही असे देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.