SRH vs RR : आयपीएल 2024 चा 50 वा सामना गुरुवारी (2 मे) सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सनरायझर्स हैदराबाद संघाने 1 धावेने विजय मिळवला. लक्ष्याचा बचाव करताना वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने एसआरएचसाठी शेवटचे षटक टाकले. षटकाच्या शेवटच्या चेंडूवर राजस्थान संघाला विजयासाठी 2 धावा आणि बरोबरी साधण्यासाठी 1 धावांची गरज होती. मात्र कुमारने विरोधी फलंदाज रोव्हमन पॉवेलला एलबीडब्ल्यू केले. त्यामुळे चाहत्यांसह संपूर्ण SRH टीम विजयाच्या जल्लोषात रंगून गेली.
लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सकडून यशस्वी जैस्वाल आणि रियान पराग यांनी आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण ते अपयशी ठरले. संघाच्या डावाची सुरुवात करताना यशस्वीने 40 चेंडूंचा सामना केला. दरम्यान, तो 167.50 च्या स्ट्राइक रेटने 67 धावा करण्यात यशस्वी झाला. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 7 चौकार आणि 2 षटकार आले. जैस्वालशिवाय चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या रियान परागने 49 चेंडूत 157.14 च्या स्ट्राईक रेटने 77 धावांचे योगदान दिले. त्याच्या बॅटमधून 8 चौकार आणि 4 षटकार आले.
या दोन फलंदाजांशिवाय सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या रोव्हमन पॉवेलने अवघ्या 15 चेंडूत 27 धावांची जलद खेळी केली. पण शेवटच्या चेंडूवर 2 धावांची गरज असताना तो बाद झाला. त्यामुळे संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
SRH विरुद्धच्या लक्ष्याचा पाठलाग करताना RR संघ निर्धारित षटकात 7 गडी गमावून केवळ 200 धावाच गाठू शकला. परिणामी रोमहर्षक लढतीत त्यांना 1 धावेने पराभव स्वीकारावा लागला.
हैदराबादच्या विजयात भुवनेश्वर कुमारचे महत्त्वाचे योगदान होते. त्याने 4 षटकात 41 धावा देऊन आपल्या संघासाठी सर्वाधिक 3 यश मिळवले. विरोधी संघातील जोस बटलर, संजू सॅमसन आणि रोव्हमन पॉवेल हे त्याचे बळी ठरले. कुमारशिवाय कॅप्टन पॅट कमिन्स आणि टी नटराजन यांनी अनुक्रमे 2-2 विकेट घेतल्या. भुवनेश्वरला त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून निवडण्यात आले आहे.