निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील चार प्रमुख उमेदवारांना खर्चात अनियमितता केल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे. या चौघांकडून ४८ तासांत उत्तर मागवण्यात आले आहे. उत्तर न दिल्यास निवडणूक खर्चातील तफावत स्वीकारण्यात आली आहे, असे समजण्यात येईल या नोटिशीत नमूद करण्यात आले आहे
महाविकास आघाडीचे शिरूर लोकसभा उमेदवार अमोल कोल्हे, पुणे लोकसभा मतदारसंघाचे रवींद्र धंगेकर, भाजपप्रणित एनडीए आघाडीचे शिरूरचे उमेदवार शिवाजीराव पाटील आणि पुण्याचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचार खर्चाची पहिली तपासणी ३ मे रोजी करण्यात आली. त्यानुसार उमेदवारांनी दिलेला दैनंदिन खर्च आणि निवडणूक विभागाने नोंदवलेला खर्च यात तफावत आढळून आली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील भाजप आघाडीचे उमेदवार शिवाजीराव पाटील यांनी 19 लाख 62 हजार 160 रुपये खर्च दाखवला असून, 43 लाख 90 हजार 81 रुपये खर्च झाल्याची नोंद निवडणूक विभागाच्या रजिस्टरमध्ये करण्यात आली आहे.
महाविकास आघाडीचे अमोल कोल्हे यांनी 15 लाख 67 हजार 368 रुपये खर्च सादर केला आहे. मात्र निवडणूक विभागाकडून 35 लाख 22 हजार 871 रुपये खर्चाची नोंद करण्यात आली आहे. कोल्हे यांच्या निवडणूक खर्चात 13 लाख 54 हजार 3 रुपयांची तफावत आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपप्रणित एनडीए आघाडीचे उमेदवार मोहोळ यांनी 33 लाख 13 हजार 402 रुपये खर्च दाखवला आहे. निवडणूक आयोगाने नोंदवलेला खर्च आणि मोहोळ यांनी केलेला खर्च यात सुमारे 27 लाख 24 हजार 232 रुपयांची तफावत आहे. महाविकास आघाडीचा धंगेकरांच्या खर्चाचा हिशेबही आयोगाच्या रजिस्टरशी जुळत नसल्याचे समोर आले आहे.
लोकसभा निवडणूककाळात निवडणूक आयोगाने विविध बाबींवर खर्च करण्याच्या रकमेची मर्यादा निश्चित केली आहे. आयोगाची या खर्चावर नजर असते.निवडणूक आयोगाने या चारही उमेदवारांना नोटीस पाठवून ४८ तासांच्या आत खर्चाच्या तफावतीचा सादर करा, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा देणारी नोटीस पाठविली आहे. .