देशातील वातावरण सध्या खूपच बदलताना दिसत आहे. देशातील अनेक भागात कडक उन्हाळा, तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडताना दिसून येत आहे. महाराष्ट्र राज्यात देखील नागरिकांना उन्हाळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. त्यात आजही नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता कमीच आहे. कारण आजही हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि कोकण प्रदेशात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. हा आठवडा देखील कोरडा आणि उष्ण असण्याची शक्यता आहे. मात्र दक्षिणेकडील राज्यांना उष्णतेपासून कदाचित दिलासा मिळू शकतो.
भारतीय हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज व्यक्त केला आहे. कोकणात आज उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. राज्यातील काही भागात तापमान हे ४० अंश सेल्सियसच्या वर जाऊ शकते. सध्या काही ठिकाणी सामान्य तापमानापेक्षा ५ ते ६ डिग्री सेल्सियस तापमान हे अधिक आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून उष्णतेच्या लाटेपासून संरक्षण करण्यासाठी काही मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत. तसेच नागिरकांनी घराबाहेर पडताना जास्तीत जास्त काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.