काही दिवसापुर्वी दिल्ली एनसीआर परिसरातील रेव्ह पार्टीचे आयोजन करून त्यात विषारी सापाचे विष पुरवल्याचा आरोप करत बिग बॉस ओटीटी विजेता आणि लोकप्रिय यु टयूबर एल्विश यादवसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर एल्विश यादवला अटकही करण्यात आली होती. आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली असून आता त्याचे नाव मनी लाँड्रिंग प्रकरणात पुढे आले आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आता त्याच्याकडे असलेल्या महागड्या गाड्यांच्या ताफ्याबाबत ईडी चौकशी करणार आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने सापाच्या विष प्रकरणात गुंतलेल्या एल्विश यादव आणि इतरांविरुद्ध नोएडा पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआर आणि आरोपपत्राच्या आधारे मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) कारवाई केली आहे.
आता एल्विशची ईडी लवकरच चौकशी करणार आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पीएफए संघटनेने एल्विशसह सहा जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. नोएडा येथील रेव्ह पार्टीमध्ये मनोरंजनासाठी औषध म्हणून वापरल्या जाणाऱ्या सापाच्या विषाचा पुरवठा केल्याच्या आरोपाखाली नोएडा सेक्टर 49 पोलीस ठाण्यात एल्विश यादवसह सहा जणांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला होता. गौतम बुद्ध नगर पोलिस आयुक्त लक्ष्मी सिंह यांच्या आदेशानुसार नोएडाच्या सेक्टर 49 पोलिस स्टेशनमधून हे प्रकरण सेक्टर 20 पोलिस ठाण्यात हस्तांतरित करण्यात आले.
यानंतर एल्विश यादव सह 17 मार्च रोजी पोलिसांनी इतर पाच जणांसह अटक केली होती आणि सर्वांवर वन्यजीव (संरक्षण) कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 120A (गुन्हेगारी कट) अंतर्गत आरोप ठेवण्यात आले होते. अटकेनंतर पाच दिवसांनी एल्विशला गौतम बुद्ध नगर जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला.
6 एप्रिल रोजी, नोएडा पोलिसांनी लोकप्रिय YouTuber आणि बिग बॉस OTT विजेता एल्विश यादव आणि इतर सात जणांविरुद्ध साप तस्करीपासून रेव्ह पार्ट्या आयोजित करण्यापर्यंतच्या आरोपांसंदर्भात आरोपपत्र दाखल केले आहे. . 1200 पानांच्या आरोपपत्रात म्हटले आहे की एल्विश सर्पमित्रांच्या संपर्कात होता आणि तसेच त्याच्याजवळून एक विषारी साप आणि क्रेट प्रजातीचे 20 मिलीलीटर विष देखील जप्त करण्यात आले होते.