अग्निशामक हे एका विशिष्ट श्रेणीतील लोक आहेत ज्यांचे काम आग विझविणे आणि जीव वाचवणे आहे. अग्निशामक हे समुदाय आणि पर्यावरण सुरक्षित ठेवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करतात यासाठी त्यांना कधी कधी जिवाचा धोका पण पत्करावा लागतो. आग विझविण्या व्यतिरिक्त अग्निशामक वाहन अपघात, कोसळलेल्या इमारती, धोकादायक वातावरण आणि इतर अनेक प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितींपासून लोकांना आणि प्राण्यांना वाचवतात. अग्निशामक जीव वाचवतात आणि म्हणूनच हा एक अत्यंत कुशल व्यवसाय मानला जातो जो समाजासाठी खूप मोठे योगदान देतो.
अग्निशमन दलाच्या व्यवसायाचे पर्यायाने त्या जवानांचे आभार मानण्याच्या उद्देशाने वर्षातून एकदा आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिनाचा मुख्य उद्देश अग्निशमन दलाच्या जवानांचा सन्मान करणे आणि त्यांचे आभार मानणे हा आहे. त्याचबरोबर हा दिवस अग्नी सुरक्षा बद्दल जागरूकता वाढविणे व अग्निशामकांना त्यांचे महत्त्वपूर्ण कर्तव्य पूर्ण करण्यासाठी आवश्यक संसाधन व उपकरण प्रदान करून त्यांनी पर्याप्त सहायता देण्याचं महत्त्व पण सांगतो.
दरवर्षी ४ मे हा जगभरात अग्निशामक दिन म्हणून साजरा केला जातो. याची सुरुवात १९९९ साली झाली. याच्या मागचं कारण असं आहे २ डिसेंबर १९९८ रोजी ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया मधील मेलबर्न शहराच्या पश्चिमेला सुमारे १५० कि.मी. अंतरावर असलेल्या मध्ये अग्निशामक दल मोठ्या जंगलातील आग विझवण्यासाठी गेले होते या संघातील पाच सदस्य गॅरी, ख्रिस इव्हान्स, स्टुअर्ट डेवीडसन, जेसन थॉमस आणि मॅथ्यू आर्मस्ट्रॉंग हे विरुद्ध दिशेने वाहत असलेल्या आगीत होरपळून मरण पावले. त्यांच्या सन्मानार्थ अग्निशामक दलाच्या जवानांच्या बलिदानाचे प्रतीक म्हणून आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन दरवर्षी चार मे ला साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिनासाठी निवडलेल्या चार तारखेचा एक अजून विशेष कारण आहे. या दिवशी सेंट फ्लोरिअन हे सर्व अग्निशामकांचे संरक्षक संत व रोमन राज्यातील अग्निशमन दलाचे पहिले ज्ञात कमांडर म्हणून ओळखले जाणारे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी मानवतावादी विचारांचे रक्षण करताना त्यांचे प्राण गमावले.
आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिनाचे प्रतीक म्हणून दोन रंगांची फीत आहे ज्यात लाल रंग फायर अर्थात अग्नी आणि निळा रंग पाणी दर्शवितो. दोन्ही फितांची लांबी ५-५ सें.मी.(२ इंच) आणि रुंदी १-१ सें.मी.(०.३९ इंच) असते व त्या आपसात जोडलेल्या असतात.
ह्या संदर्भात नाशिक मध्ये घडलेली एक घटना सांगितल्या शिवाय राहवत नाही. घटना पण अशी की अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. सुमारे 90 वर्षांपूर्वीचा प्रसंग पण आजही नाशिककरांना स्तिमित करून जाणारा आहे. ती एक काळरात्रच ठरली होती. दिवसभराच्या कामाने दमून रात्रीला विसावा घेणारे सर्व गाढ झोपेत असताना एका दुमजली इमारतीला आग लागली हे अग्निशमन गाडीच्या घंट्या च्या आवाजाने कळताच सर्व लोक जागे झाले व रस्त्यावर आले. त्या इमारतीत अनेक बिऱ्हाडे होती. आगीचे लोळ आत शिरत होते आणि आतले लोक जीव मुठीत धरून बाहेर धाव घेत होते. आत अडकलेले लोक जीवाच्या आकांताने आरडाओरडा करत होते. खाली चौकाच्या सोप्यात गाईगुरे बांधलेली होती ती पण दाव्याला हिसके मारून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होती.
वरच्या मजल्यावर काही मुले अडकून पडली होती खिडकीशी येऊन ती मदतीसाठी आकांत करत होती. अग्निशामक दलाची गाडी आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती पण आगीचे प्रचंड लोळ विझवणे अशक्य होत होते. त्या मुलांची आई वेड्यासारखी धावत होती व त्यांना वाचवायला त्या आगीत शिरायला धावली. लोकांनी तिला अडवले व हात धरून मागे पण खेचले तिचे हृदय आपल्या लेकरांच्या आवाजाने विदीर्ण झाले होते. सर्व जनसमुदाय पण असहाय, मृत्यूला उघड्या डोळ्यांनी कवटाळण्याचे धैर्य करून त्या मुलांना वाचवायला कुणी धजेना. तेवढ्यात एक तरुण तिथे धावत आला त्याने काचा कसला आणि त्या आगीत तो बाणासारखा शिरला व जनसमुदायांच्या डोळ्यांचे पाते लवते न लवते तो तरुण भरभर त्या इमारतीच्या त्या मजल्यावर अडकलेल्या मुलांपाशी पोहोचला. दुसऱ्या मजल्याला आता आगीने पूर्ण वेढलेले होते जिना कोसळून पडला होता.
त्या तरुणाने समय सूचकतेचे प्रमाण देत एकेका गादीत एकेक मुलाला गुंडाळले आणि खिडकीतून लोकांना हाक दिली की गादीत गुंडाळलेल्या मुलांना झेलून घ्या. जनसमुदायाने गादीतील मुलांना अलगद झेलले. मुले वाचली त्यांच्या आईने त्यांना पोटाशी घेऊन मोकळा श्वास घेतला. पण त्या आत शिरलेल्या तरुणाचे काय? तो तरुण म्हणजे -बापूराव गायधनी-कृतार्थतेने निश्वास टाकत होता. कृतकृत्य झाल्याचे विलक्षण समाधान त्याच्या चेहऱ्यावर विलसत होते. त्या पेटलेल्या आगीतून त्याने उडी मारत बाहेर धाव घेतली. त्याचे अंग ठीक ठिकाणी भाजून निघाले होते. डोक्याचे केस अर्धवट जळाले होते चेहरा विद्रूप दिसत होता. जनता त्या वीरा पुढे नतमस्तक झाली त्याला त्वरित दवाखान्यात न्यायला लोक पुढे आली तोच चौकाच्या सोप्यातून एका गाईचा हंबरडा बापूच्या कानी पडला. त्याचे हृदय हेलावले तो लोकांच्या अडवण्याला झुगारून पुन्हा त्या आगीत शिरला व गाई जवळ पोहोचला.
अंगाला आगीचे चटके बसत होते पण काही करून त्या गाईला वाचवायचे होते. काही गुरांना त्याने मोकळे केले पण एका गाईच्या दाव्याची गाठ सुटेना, बापूरावाने अंगातले उरलेसुरले सगळे बळ लावून दावे जोरात ओढले. खुंट्या सहित ते दावे हाती आले गाय मोकळी झाली. गाईला वाचवून त्या तरुणाने आपले ‘गायधनी’हे आडनाव सार्थ केले. आगीच्या भयंकर जखमांनी विव्हळणारा बापूराव त्या अग्नी प्रलयातून पुन्हा बाहेर आला. त्या देवदूताला पाहून आपल्या लेकरांना पोटाशी घेऊन ती माता तरुणापुढे वाकणार,तोच बापूराव बेशुद्ध होऊन खाली पडला. त्याला दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी प्रयत्नांची शिकस्त केली पण भयंकर जखमांनी विव्हळणाऱ्या बापूरावाला ते वाचवू शकले नाहीत.
इतरांचे प्राण वाचवण्यासाठी बापूरावाने आपले प्राण वेचले. भूतदयेवर आधारलेल्या भारतीय संस्कृतीची शान बापूरावाने राखली. बापूराव नश्वर जग सोडून गेला आणि अमर झाला. लोकांनी बापूराव गायधनी चे उचित स्मारक नाशकात सरकारवाड्यासमोर बांधले. या स्मारकाचा शिलान्यास भोसला मिलिटरी स्कूलचे संस्थापक डॉ. मुंजे यांनी १९३७ साली केला. स्मारकाचे उद्घाटन १० मे १९५३ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या हस्ते झाले. स्मारकावर “Bapu Gayadhani Lives Through His Glorious Death” हे महात्मा गांधींचे उद्गार आहेत.
त्यांना “वीर” ही बहुमानाची पदवी दिली गेली. नाशिक येथे वीर बापूराव गायधनी स्मारक समितीच्या वतीने प्रतिवर्षी वीर व साहसी व्यक्तीला पारितोषिक देऊन त्यांचा गौरव केला जातो. भारत सरकारकडून वीर बापू गायधनी यांच्या नावाने राष्ट्रीय शौर्य पुरस्कार दिला जातो. पूर्वी मराठीच्या शालेय पाठ्यपुस्तकात त्यांच्यावर धडा होता.
‘धन्य भारत देश आणि धन्य ती भूतदया शिकविणारी भारतीय संस्कृती’!
रचना खांदवे,नाशिक
सौजन्य – समिती संवाद, पश्चिम महाराष्ट्र प्रांत