भारताच्या संदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केलेल्या वक्तव्याचे परराष्ट्र मंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांनी खंडन करत पलटवार केला आहे.बायडेन यांनी भारताचा उल्लेख ‘जेनोफोबिक देश’ असा केला होता. ‘जेनोफोबिक’ म्हणजे असा देश ज्यांना त्यांच्या देशात स्थलांतरित अजिबात नको असतात किंवा त्यांच्या विरोधात भीतीचे वातावरण निर्माण केले जाते. याला उत्तर देताना जयशंकर यांनी भारत खुल्या मनाच्या माणसांचा देश असून पाहुणचारासाठी सुप्रसिद्ध असल्याचे सांगितले आहे.
2 एप्रिल रोजी, बिडेन म्हणाले होते की, अमेरिका आपल्या मातीत स्थलांतरित लोकांचे स्वागत करते त्यामुळे आमची अर्थव्यवस्था वाढते आहे. तर भारत, चीन, जपान आणि रशियाचा जेनोफोबिक स्वभाव त्यांच्या आर्थिक समस्यांसाठी जबाबदार आहे. जर देशांनी इमिग्रेशन अधिक स्वीकारले तर रशिया आणि चीनसह जपानची आर्थिक स्थिती अधिक चांगली होईल. बिडेन म्हणाले की जपान, रशिया आणि भारतासमोर समस्यांचे कारण म्हणजे हे देश जेनोफोबिक आहेत त्यांना स्थलांतरित नको आहेत.
यापार्श्वभूमीवर बोलताना एस. जयशंकर म्हणाले की, जगाच्या इतिहासात भारत हा नेहमीच गरजूंना मदत करणारा देश राहिला आहे. वेगवेगळ्या समाजातील लोक भारतात येतात आणि त्यामुळेच आपला देश खास बनतो. जगाच्या इतिहासात भारत हा नेहमीच गरजूंना मदत करणारा देश राहिला आहे. भारत खुल्या मनाच्या माणसांचा देश असून पाहुणचारासाठी सुप्रसिद्ध आहे.
भारत सरकारने आणलेला नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) भारताच्या स्वागतार्ह दृष्टिकोनाचे प्रतिबिंबित करतो. म्हणूनच आमच्याकडे सीएए आहे, जो संकटात सापडलेल्या लोकांसाठी एक महत्त्वाचा मार्ग असेल. मला वाटते ज्यांना भारतात येण्याची गरज आहे, ज्यांचा भारतात येण्याचा दावा आहे, त्यांचे आपण खुले स्वागत केले पाहिजे. सीएएवर टीका करणाऱ्यांबाबत परराष्ट्र मंत्री म्हणाले की, असे लोक आहेत ज्यांनी जाहीरपणे म्हटले आहे की सीएएमुळे या देशातील 10 लाख मुस्लिम त्यांचे नागरिकत्व गमावतील. त्यांच्याकडून उत्तरे का घेतली जात नाहीत ? अद्याप कोणी त्यांचे नागरिकत्व गमावले आहे का? असा सवाल जयशंकर यांनी उपस्थित केला.
त्या नंतर पाश्चिमात्य मिडीयावर भाष्य करताना ते म्हणाले की, एका विशिष्ट विचारसरणीचा प्रभाव असलेला पाश्चिमात्य मीडियाचा एक गट भारताला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहे. जागतिक कथनावर आपले नियंत्रण असावे असे हा वर्ग नेहमीच मानत आला आहे. अशा लोकांनी अनेक प्रकरणांतून आपले राजकीय हितसंबंधही उघड केली आहेत. त्यांनी भारतातील इतर राजकीय पक्षांना उघड पाठिंबा देण्याचे संकेत दिले आहेत. विशिष्ट मुद्द्यांवर ते पुढे आले आहेत आणि त्यांचा अजेंडा पुढे ढकलण्याचाही प्रयत्न केला आहे. जर त्यांनी विधान केले किंवा निर्णय दिला तर हे विचार कुठून येत आहेत हे तुम्ही ओळखले पाहिजे अशा शब्दात त्यांनी एकांगी परदेशी माध्यमांची खरडपट्टी काढली आहे .