RCB vs GT : काल (4 मे) आयपीएल 2024 च्या 52 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्सचा 4 विकेट्सने पराभव केला. त्यामुळे आरसीबीने गुणतालिकेत तीन स्थानांची मोठी झेप घेतली आहे. तर प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आरसीबीच्या आशा अजूनही कायम आहेत.
गुजरात टायटन्सच्या 148 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बंगळुरूने वेगवान सुरुवात केली. कर्णधार फाफ डुप्लेसिस आणि विराट कोहली यांनी पहिल्या विकेटसाठी 5.5 षटकांत 92 धावांची भागीदारी केली. यावेळी फाफ डुप्लेसिसने 64 धावांची खेळी केली. मात्र, पुढच्या 31 धावांत पाच गडी बाद झाले. तसेच विराट कोहलीचे अर्धशतक हुकले आणि तो 42 धावा करून बाद झाला. दिनेश कार्तिक 21 धावांवर नाबाद राहिला तर स्वप्नील सिंग 15 धावांवर नाबाद राहिला.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना गुजरातचा संपूर्ण संघ 147 धावा करून सर्वबाद झाला. संघातर्फे शाहरुख खानने 37 धावांचे आणि राहुल तेवतियाने 35 धावांचे योगदान दिले. तर गोलंदाजीत मोहम्मद सिराज आणि विजयकुमार वैशाक यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.