जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात शनिवारी दहशतवाद्यांनी ताफ्यावर केलेल्या गोळीबारात भारतीय हवाई दलाचा (IAF) एक जवान शहीद झाला असून चार जण जखमी झाले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सुरनकोटच्या सनई गावात हा हल्ला झाला.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, स्थानिक राष्ट्रीय रायफल्स युनिटने ज्या भागात हल्ला झाला त्या भागाला घेराव घालून शोध मोहीम सुरू केली आहे. भारतीय हवाई दलाने सांगितले की, या घटनेत सहभागी असलेल्या दहशतवाद्यांविरोधात लष्कर आणि पोलीस संयुक्त कारवाईत गुंतले आहेत.
“जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील शाहसीतारजवळ दहशतवाद्यांनी भारतीय हवाई दलाच्या वाहनांच्या ताफ्यावर हल्ला केला. स्थानिक लष्करी तुकड्यांकडून परिसरात घेराव आणि शोध मोहीम सुरू आहे”, असे ट्विट भारतीय हवाई दलाने केले आहे.
ज्या भागात हा हल्ला झाला तेथे भारतीय हवाई दलाचे गरुड विशेष दल तैनात करण्यात आले आहे. “दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत, हवाई योद्धांनी प्रत्युत्तरादाखल लढा दिला. या प्रक्रियेत, भारतीय हवाई दलाच्या पाच जवानांना गोळीबाराचा फटका बसला आणि त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी जवळच्या लष्करी रुग्णालयात हलवण्यात आले. नंतर यामध्ये एका हवाई योद्धाचा मृत्यू झाला. तर आता या हल्ल्यानंतर स्थानिक सुरक्षा दलांकडून पुढील कारवाई सुरू आहे, असे भारतीय हवाई दलाने शनिवारी रात्री एका अपडेटमध्ये सांगितले.
भारतीय हवाई दलाने सांगितले की, वाहने शाहसीतारजवळील सामान्य भागात एअरबेसच्या आत सुरक्षित करण्यात आली आहेत.