गुना-शिवपुरी येथील भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे पुत्र महाआर्यमन सिंधिया हे आज कोलारस आणि शिवपुरी विधानसभेच्या ग्रामीण भागात जनसंपर्क करणार होते, मात्र आता त्यांचा हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. कारण आजी राजमाता माधवी राजे यांची प्रकृती खालावल्याने महाआर्यमन सिंधिया दिल्लीला रवाना झाल्याचं सांगण्यात येत आहे.
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या आईवर गेल्या अनेक दिवसांपासून एम्समध्ये उपचार सुरू आहेत. गुना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या आई राजमाता माधवी राजे सिंधिया यांची प्रकृती खालावल्याची माहिती 30 एप्रिल रोजी मिळाली होती. यानंतर ज्योतिरादित्य यांच्या पत्नी प्रियदर्शिनी राजे सिंधिया दिल्लीला रवाना झाल्या. त्यामुळे त्यांचा 2 मे पर्यंतचा दौरा रद्द करण्यात आला. यानंतरही प्रियदर्शिनी दिल्लीहून परत येऊ शकल्या नाहीत. राजमाता यांची ढासळलेली प्रकृती हे यामागचे प्रमुख कारण मानले जात होते आणि आज रविवारी महाआर्यमन सिंधियाही दिल्लीला रवाना झाले आहेत.
भाजपने यावेळी गुना शिवपुरी लोकसभा मतदारसंघातून ज्योतिरादित्य सिंधिया यांना उमेदवार म्हणून घोषित केले आहे. लोकसभा निवडणूक 2024 साठी आतापर्यंत दोन टप्प्यात मतदान झाले आहे. आता तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 मे रोजी होणार आहे. सिंधिया कुटुंब या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पूर्णपणे गुंतले आहे. मात्र, रविवारी सायंकाळी 6 वाजल्यापासून निवडणूक प्रचारावर बंदी घालण्यात येणार आहे. त्याआधीच महाआर्यमन दिल्लीला रवाना झाल्याचं म्हटलं जात आहे.