Rohit Pawar : आज (5 मे) लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर आज बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या प्रचार सभा पार पडल्या. तर यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जाहीर सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.
रोहित पवार म्हणाले की, जेव्हा राष्ट्रवादी पक्ष फुटला त्यावेळी मी आणि काही पदाधिकारी साहेबांसोबत (शरद पवार) बसलो होतो. त्यावेळी आम्ही साहेबांशी चर्चा करत होतो आणि ते टिव्हीकडे बघत होते. पण त्यांनी चेहऱ्यावर काही दाखवलं नाही. नंतर आम्ही त्यांना काही प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी आम्हाला उत्तरं दिली.
शरद पवारांनी आम्हाला सांगितले की, तुम्ही काळजी करू नका, हा आपला स्वाभिमानी महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे. तो घडवण्यासाठी नवीन पिढीला आपल्याला ताकद द्यायची आहे. जोपर्यंत नवीन पिढी जबाबदारी घेण्यासाठी तयार होत नाही तोपर्यंत मी माझे डोळे मिटणार नाही, असे पवार साहेबांचे शब्द होते, असे रोहित पवारांनी सांगितले.
हा प्रसंग सांगताच रोहित पवारांना भरसभेत अश्रू अनावर झाले आणि ते भावूक होत शरद पवारांना उद्देशून म्हणाले की, साहेब मी तुम्हाला विनंती करतो की कृपा करून तुम्ही हे वक्तव्य पुन्हा करू नका. कारण तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात. मोठे नेते तुम्हाला काहीही बोलले तरी सामान्य जनता आणि पवार कुटुंब तुमच्यासोबत आहे, असेही रोहित पवार म्हणाले.