लोकसभा निवडणूक जसजशी पुढे जात आहे. तसतशी सर्व पक्षांची धाकधूक वाढत आहे. महाराष्ट्रात उद्या ११ जागांवर तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. मात्र महायुतीमध्ये नाशिकच्या जागेवरून बरेच दिवस तिढा कायम होता. अखेर त्या ठिकाणी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना तिकीट देण्यात आले आहे. मात्र त्यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीकडून माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना तिकीट देण्यात आले आहे. नाशिकची ठाकरे गटाचे विजय करंजकर हे इच्छुक होते. मात्र तिकीट न मिळाल्यामुळे ते नाराज झाले होते. आता त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे हा ठाकरे गटाला आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का समजला जात आहे.
नाशिकमधील ठाकरे गटाचे निष्ठावंत विजय करंजकर यांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र केला आहे. विजय करंजकर आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. नाशिक लोकसभेमध्ये महाविकास आघाडीमध्ये म्हणजेच ठाकरे गटातील एका नेत्याने बंडखोरी केल्याचे समोर आले आहे. नाशिकमध्ये ठाकरे गटाने विजय करंजकर यांचा पत्ता कट करून सिन्नरचे असलेले माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे नाराज झालेल्या करंजकर यांनी बंडखोरी केली आहे. नाराज करंजकर यांना मातोश्रीवर भेट घेण्यासाठी बोलावण्यात आले होते. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. आता नाराज करंजकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला आहे.