येत्या १ जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धा होणार आहे. यासाठी अनेक संघांनी आपल्या खेळाडूंची नावेही जाहीर केली असून स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. दरम्यान वेस्ट इंडिजला टी-२० विश्वचषकादरम्यान दहशतवादी हल्ला होण्याची धमकी मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकादरम्यान दहशतवादी हल्ल्याची धमकी उत्तर पाकिस्तानकडून मिळाली आहे. अधिक माहिती अशी की, प्रो इस्लामिक स्टेटने क्रीडा स्पर्धांदरम्यान हल्ले करण्याची योजना आखली आहे. आयएस खोरासानच्या अफगाणिस्तान-पाकिस्तान शाखेकडून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये त्याने अनेक देशांमध्ये हल्ले करण्याबाबत म्हटले आहे आणि समर्थकांना यामध्ये सामील होण्याचे आवाहन केले आहे.
टी-२० विश्वचषकाचे सह-यजमान क्रिकेट वेस्ट इंडिजचे सीईओ जॉनी ग्रेव्हज यांनी दहशतवादी हल्ल्याच्या धोक्यात सुरक्षाविषयक चिंता पूर्णपणे फेटाळून लावल्या आहेत. टी-२० विश्वचषकात सामील असलेल्या सर्वांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. आमच्याकडे सर्वसमावेशक आणि मजबूत सुरक्षा योजना आहेत, असे आश्वासनही ग्रेव्हज यांनी दिले.
दरम्यान बार्बाडोसचे क्षेत्रीय सुरक्षा अधिकारी आयसीसी टी-२० विश्वचषकादरम्यान हल्ल्याचा इशारा दिल्यानंतर परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत. प्रो इस्लामिक स्टेटच्या नाशीर पाकिस्तान मीडिया ग्रुपकडून ही धमकी मिळाली आहे.
१ जूनपासून टी-२० विश्वचषक स्पर्धा सुरू होणार असून अंतिम सामना २९ जून रोजी होणार आहे. या स्पर्धेत एकूण ५५ सामने होणार असून त्यात ४० गट सामने होतील आणि त्यानंतर सुपर ८ सामने आयोजित केले जातील. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या स्तरावर टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धा आयोजित केली जात आहे.